विमानाला दिलेल्या इशाऱ्याचे रेकॉर्डिंग सादर
By admin | Published: November 27, 2015 12:20 AM2015-11-27T00:20:20+5:302015-11-27T00:20:20+5:30
तुर्कस्तानने रशियन विमान पाडल्याच्या घटनेला दोन दिवस झाल्यानंतरही उभय देशातील शाब्दिक संघर्ष सुरूच आहे.
अंकारा : तुर्कस्तानने रशियन विमान पाडल्याच्या घटनेला दोन दिवस झाल्यानंतरही उभय देशातील शाब्दिक संघर्ष सुरूच आहे. दरम्यान, आपल्या बचावाची बाजू भक्कम करताना गुरुवारी तुर्कस्तानने रशियन विमानाला दिलेल्या इशाऱ्याचे रेकॉर्डिंगच सादर केले आहे.
सीरियाच्या सीमेजवळ हे विमान पाडण्यात आले होते. तत्पूर्वी तुर्कीच्या सैन्याने या विमानाला इशारा दिला होता. यात म्हटले होते की, आपले विमान तुर्कस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करत आहे. विमानाची दिशा त्वरित बदला. वारंवार इशारा देऊनही हे विमान हवाई हद्दीत आल्याने पाडण्यात आल्याचा दावा तुर्कीने केला आहे. तुर्कस्तानच्या सैन्य विभागाने या १० आॅडियो क्लिप्स सादर केल्या आहेत, ज्यात हा इशारा देण्यात आला होता.
दावा फेटाळला
दरम्यान, पाडण्यात आलेल्या विमानातील बचावलेल्या पायलटने तुर्कीचा हा दावा फेटाळला आहे. विमान पाडण्यापूर्वी असा कोणताही इशारा देण्यात आला नव्हता, असे पायलट कोनस्टॅन्टीन मुराखतीन याने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)