डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'गोल्ड कार्ड' योजनेमुळे भारतीयांचे स्वप्न भंगणार; काय परिणाम होणार? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 21:37 IST2025-02-26T21:36:58+5:302025-02-26T21:37:19+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज गोल्ड कार्ड योजना जाहीर केली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'गोल्ड कार्ड' योजनेमुळे भारतीयांचे स्वप्न भंगणार; काय परिणाम होणार? पाहा...
US Gold Card: अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे देशात अवैधरित्या राहणाऱ्यांना बाहेर काढण्याची मोहिम सुरू केली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी घोषणाही केली आहे. ट्रम्प यांनी नवीन 'गोल्ड कार्ड' योजना जाहीर केली, ज्याद्वारे अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार आहे. पण, यासाठी मोठी किंमत मोजावे लागणार आहे. तुम्हाला अमेरिकत कायमचे वास्तव्य करायचे असेल, तर त्यासाठी 5 मिलियन डॉलर्स (43 कोटी रुपये) खर्च करावे लागतील.
गुंतवणूक आणि नोकऱ्या वाढवण्यावर भर
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी 'गोल्ड कार्ड' योजनेची घोषणा केली. ते म्हणाले की, $5 मिलियन शुल्क भरुन स्थलांतरितांना अमेरिकेत राहण्याची परवानगी मिळू शकते. ही योजना सध्याच्या 35 वर्षे जुन्या EB-5 व्हिसा कार्यक्रमाची जागा घेईल. पूर्वी अमेरिकन व्यवसायांमध्ये किमान एक मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अट होती. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांची ही योजना अमलात आल्यास, अनेक वर्षांपासून ग्रीन कार्ड मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
नवीन योजना एप्रिलपासून सुरू होणार
डोनाल्ड ट्रम्प यांची ही योजना एप्रिलपर्यंत लागू होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला सुमारे 10 मिलियन गोल्ड कार्ड व्हिसा जारी केले जाऊ शकतात. या योजनेद्वारे श्रीमंत लोक आपल्या देशात येतील, भरपूर पैसा खर्च करतील, भरपूर कर भरतील आणि भरपूर लोकांना रोजगार देतील, असे ट्रम्प म्हणाले.
गोल्ड कार्ड व्हिसा आणि EB-5 मधील अंतर
सध्याच्या EB-5 कार्यक्रमांतर्गत परदेशी गुंतवणूकदारांना अमेरिकन व्यवसायांमध्ये $800,000-1,050,000 ची गुंतवणूक करणे आणि किमान 10 नवीन रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे. परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी 1990 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमावर गेल्या अनेक वर्षांपासून गैरव्यवहार आणि फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. आता या नवीन गोल्ड कार्ड व्हिसा योजनेद्वारे $5 मिलियनची गुंतवणूक येईल. यूएस रेसिडेन्सी मिळवण्याचा हा एक जलद आणि सोपा मार्ग आहे. यामध्ये नोकऱ्या निर्माण करण्याची गरजही संपुष्टात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, EB-5 कार्यक्रमांतर्गत नागरिकत्व पाच ते सात वर्षांत उपलब्ध होते, तर प्रस्तावित गोल्ड कार्ड व्हिसा योजनेंतर्गत नागरिकत्व त्वरित उपलब्ध होईल.
भारतीयांवर काय परिणाम होईल?
$5 मिलियन (43,56,14,500.00 भारतीय रुपये) ची किंमत म्हणजे फक्त भारतातील अतिश्रीमंत उद्योगपतींनाच अमेरिकेचे नागरिकत्व मिळणे परवडणारे आहे. यामुळे अनेक दशकांपासून ग्रीन कार्डची प्रतीक्षा करणाऱ्या कुशल व्यावसायिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, EB-5 अंतर्गत अर्जदार कर्ज घेऊ शकतात किंवा निधीचा लाभ घेऊ शकतात, तर गोल्ड कार्ड व्हिसासाठी संपूर्ण रोख पेमेंट आवश्यक आहे, ज्यामुळे ते भारतीयांच्या मोठ्या वर्गाच्या आवाक्याबाहेर आहे.