अमेरिकेत १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लस; राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 08:44 AM2021-04-07T08:44:16+5:302021-04-07T08:49:17+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
वॉशिंग्टन : केवळ भारतात नाही, तर जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. यातच अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. भारतातूनही काही देशांना कोरोना लसींचा पुरवठा केला जात आहे. अमेरिकेतही कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. १९ एप्रिलपासून सर्व सज्ञान व्यक्तींना कोरोना लस देण्याचे बायडन यांनी जाहीर केले आहे. (joe biden on corona vaccination in america)
अमेरिकेतही कोरोनाचे प्रमाण अधिक आहे. तसेच लसीकरणावरही भर दिला जात आहे. मात्र, आता १९ एप्रिल २०२१ पासून १८ वर्ष आणि त्यावरील सर्व व्यक्ती कोरोना लसीकरणासाठी पात्र असतील, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली आहे. अमेरिकेतील बहुतांश नागरिकांना १ मे २०२१ पर्यंत कोरोना लस देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नये
१९ एप्रिलपासून १८ वर्ष आणि त्यावरील प्रत्येक व्यक्ती कोरोना लसीकरणासाठी पात्र मानली जाईल. तसेच याशिवाय अन्य कोणताही नियम नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोरोना लस घेण्यासाठी अधिकाधिक संख्येने पुढे यावे, असे आवाहन जो बायडन यांनी केले आहे. गेल्या ७५ दिवसांमध्ये अमेरिकेत १.५ कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून, आगामी काही दिवसात २ कोटी नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यापैकी ७५ टक्के ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात आली असून, हा लसीचा पहिला डोस असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोना लसीकरण केंद्रात वाढ
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेतील ५० राज्यांमध्ये कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या १७ हजारवरून ४० हजार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच कोरोना लसीकरणानंतर अमेरिकेच्या अर्थव्यवस्था रुळावर येण्याकडे लक्ष केंद्रीत केले जाईल, असे म्हटले जात आहे.
कोरोनाचा कहर! पुढील चार आठवडे महत्त्वाचे; केंद्र सरकारचा गंभीर इशारा
दरम्यान, भारतातही कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस द्यावी, अशी मागणी मी आधी केली होती आणि आपण ती मान्य केली. आता लसीकरण वयोगट आणखी कमी करा, असेही या पत्रात म्हटले आहे.