निवडणूक पराभवानंतरही राष्ट्राध्यक्ष ओबामा खंबीर
By admin | Published: November 7, 2014 04:21 AM2014-11-07T04:21:14+5:302014-11-07T04:21:14+5:30
मध्यावधी निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा खंबीरपण कायम असून
वॉशिंग्टन : मध्यावधी निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा खंबीरपण कायम असून, त्यांनी रिपब्लिकन पक्षाशी मिळतेजुळते घेऊन काम करण्याची तयारी दर्शविली आहे. पण स्थलांतर सुधारणासारख्या महत्त्वाच्या मुद्यावर आपण काँग्रेसला बाजूला ठेवू व ११ दशलक्ष बेकायदेशीर नागरिकांना (२.४ लाख भारतीय) कायदेशीर नागरिकत्व देऊन देशात राहण्याची परवानगी देऊ, असे म्हटले आहे.
अमेरिकेचे भवितव्य उज्ज्वल आहे याबद्दल खात्री असल्याचे ओबामा यांनी आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात सांगितले. अमेरिका हा पृथ्वीवरील सर्वात उत्कृष्ट देश आहे. जगातील कोणत्याही देशापेक्षा चांगले पत्ते आपल्या हाती आहेत.
अमेरिकेच्या भवितव्याबाबत मी आशावादी आहे. सध्या नागरिक अस्वस्थ आहेत हे मला माहीत आहे; पण वस्तुस्थिती पाहिली तर इतर कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेची अर्थव्यवस्था अधिक समर्थ आहे, असे ओबामा म्हणाले.
जगातील सर्वोत्कृष्ट बाबी स्वत:कडे खेचून घेण्याची क्षमता आजही अमेरिकेत आहे, अमेरिका एक चुंबक असून जगातील उत्कृष्ट व उज्ज्वल बाबी त्याकडे खेचल्या जातात. माझ्या कारकीर्दीची आणखी दोन वर्षे राहिली आहेत, या कालावधीत काहीतरी भरीव, बळकट काम करावे अशी माझी इच्छा आहे. हे काम काँग्रेसच्या साथीने, सहकार्याने करायचे आहे; पण जे काम काँग्रेसच्या सहकार्याने शक्य नसेल ते मी माझ्या हिमतीवर करीन. आपल्याला आत्मविश्वास असेल तर काहीही करता येते, नागरिकांना प्रगती व आशा यांची जाणीव देता येते, असे ओबामा म्हणाले. (वृत्तसंस्था)