आर्क्टिकमधील भारतीय शास्त्रज्ञांशी राष्ट्रपतींचा संवाद
By admin | Published: October 15, 2014 03:44 AM2014-10-15T03:44:27+5:302014-10-15T03:44:27+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताचे पहिले आर्क्टिक संशोधन केंद्र हिमाद्री स्टेशन येथील भारतीय शास्त्रज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला
ओस्लो : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताचे पहिले आर्क्टिक संशोधन केंद्र हिमाद्री स्टेशन येथील भारतीय शास्त्रज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. हिमाद्री स्टेशन उत्तर ध्रुवापासून १,२०० कि. मी. वर आहे. येथील फ्रॅम म्युझियममधून मुखर्जी यांनी सोमवारी सायंकाळी दुर्गम भागात काम करत असलेल्या भारतीय शास्त्रज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. नॉर्वेच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपतींना हिमाद्री स्टेशनवर कार्यरत एका भारतीय शास्त्रज्ञाने सांगितले की, ‘सर, धन्यवाद. येथे खूप थंड वातावरण आहे. मात्र, काम करण्यासाठी हे एक रोमाचंक ठिकाण आहे. कारण, येथे होणाऱ्या कोणत्याही बदलाचा परिणाम भारतातील वातावरणावर पडतो.’
आर्क्टिकच्या बदलांमुळे भारताच्या मान्सूनवर पडणाऱ्या प्रभावावर तुमचे निरीक्षण काय आहे? या क्षेत्रातील बदल भारतातील मान्सून कसा प्रभावित करतात, असा राष्ट्रपतींनी प्रश्न विचारला, त्यावर शास्त्रज्ञाने उत्तर दिले की, आर्क्टिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा प्रभाव भारतातील हवामानावर होतो, कारण हिमनद्या वितळल्यामुळे समुद्राचा जलस्तर वाढतो आणि त्यामुळे वातावरणात बदल होतात.
दुष्काळात होणारे बदल मुख्यत्वे आर्क्टिक क्षेत्रातूनच उत्पन्न होतात, असे या शास्त्रज्ञाने सांगितले. (वृत्तसंस्था)