युक्रेनच्या संसदेत पंतप्रधानांना धक्काबुक्की
By admin | Published: December 13, 2015 02:20 AM2015-12-13T02:20:37+5:302015-12-13T02:20:37+5:30
युक्रेनचे पंतप्रधान अरसेनी यात्सेनयूक त्यांच्या सरकारच्या कामगिरीचे जोरदार समर्थन करीत असताना शुक्रवारी संसदेत एका खासदाराने त्यांना त्यांच्या आसनावरून बाजूला ढकलले.
कीव्ह : युक्रेनचे पंतप्रधान अरसेनी यात्सेनयूक त्यांच्या सरकारच्या कामगिरीचे जोरदार समर्थन करीत असताना शुक्रवारी संसदेत एका खासदाराने त्यांना त्यांच्या आसनावरून बाजूला ढकलले. परिणामत: खासदारांमध्ये अक्षरश: हाणामारी झाली.
संसदेत प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांच्या गटाच्या एका खासदाराने पंतप्रधानांना त्यांच्या आसनावरून बाजूला ढकलल्याने गोंधळास प्रारंभ झाला. ओलेग बर्ना नावाचा हा खासदार त्यांच्या आसनाजवळ आला आणि त्यांना गुलाबी पुष्पगुच्छ देण्याचे निमित्त करून त्यांना आसनावरून बाजूला ढकलले. ओलेग बर्ना हे पंतप्रधान यात्सेनयूक यांचे कडवे विरोधक मानले जातात. यात्सेनयूक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांनी मोहीम उघडली आहे.
बर्ना यांनी यात्सेनयूक यांना पाठीमागून पकडले आणि ढकलून देण्याचा प्रयत्न केला; पण उंच आणि सडपातळ असलेले पंतप्रधान यात्सेनयूक यांनी स्वत:ला सावरले. याही स्थितीत त्यांना ढकलण्याचा प्रयत्न झाला.
ही घटना घडताच पंतप्रधान समर्थक डझनभर खासदारांनी पंतप्रधानांकडे धाव घेतली आणि बर्ना यांना ठोसे लगावले. यावेळी झालेल्या हाणामारीत कोणीही फारसे गंभीर जखमी झाले नाही.
युक्रेनच्या संसदेत खासदारांची संख्या ४५० असून तेथे खासदारांत होणारी हाणामारी नित्याचीच बाब आहे. त्यात अध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्या समर्थक खासदारांत उभी फूट पडली आहे. येथील सरकार रशियाविरोधी आणि पाश्चिमात्य समर्थक आहे. रशियन समर्थक बंडखोरांच्या कारवायांनी गेल्या काही वर्षांत ९ हजार लोक ठार झाले आहेत. त्यातच राजकीय नेत्यांत असे गंभीर मतभेद निर्माण झाले आहेत. (वृत्तसंस्था)
संसद ही सर्कस नाही आणि शक्तिप्रदर्शनाचे स्थानही नाही. देशासाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
- अरसेनी यात्सेनयूक (पंतप्रधान)