पंतप्रधान, अर्थमंत्र्यांच्या भांडणात फ्रान्सचे सरकार बरखास्त
By admin | Published: August 26, 2014 12:17 AM2014-08-26T00:17:02+5:302014-08-26T00:17:02+5:30
देशाच्या खुंटलेल्या आर्थिक विकासाच्या मुद्यावर सरकारमध्ये उघडपणे सुरू झालेल्या भांडणांनंतर फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकाईस हॉलंड यांनी सोमवारी सरकारच बरखास्त करून टाकले.
पॅरिस : देशाच्या खुंटलेल्या आर्थिक विकासाच्या मुद्यावर सरकारमध्ये उघडपणे सुरू झालेल्या भांडणांनंतर फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकाईस हॉलंड यांनी सोमवारी सरकारच बरखास्त करून टाकले. सरकारच्या आर्थिक धोरणांवर अर्थमंत्र्यांनी कठोर टीका करून आपल्या मर्यादांचे उल्लंघन केल्याचा आरोप करून पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांनी आपल्या सरकारचा राजीनामा सादर केला.
यावर्षी फ्रान्स सरकारची आर्थिक वाढ झालेली नाही. शिवाय युरोपियन युनियनकडून फ्रान्सवर आर्थिक घडी नीट बसविण्यासाठी सतत दबाव आहे.
या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अर्नाऔद मॉन्टेबोर्ग यांनी युरोपियन युनियनच्या आर्थिक काटकसरीच्या उपायांनी अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे का असा प्रश्न विचारला आहे. मॉन्टेबोर्ग यांनी आमच्या अर्थव्यवस्थेतील मोठे बदल हे अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या बाजूनेच व्हायला हवेत, असेही म्हटले होते.
मॉन्टेबोर्ग यांच्या या वक्तव्यानंतर समाजवादी नेत्यांनी त्यांच्यावर टीका करून अर्थमंत्र्यांची भूमिका ही सरकारमध्ये राहून सरकारवरच टीका करणारी नव्हे, तर पाठराखण करण्याची असली पाहिजे, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. सोशालिस्ट पार्टीचे प्रवक्ते कार्लोस डी सिल्व्हा यांनी ‘ली फिगारो’ वृत्तपत्राशी बोलताना मॉन्टेबोर्ग यांनी केवळ चर्चा सुरू न करता फ्रान्सला पुन्हा विकासाच्या मार्गावर कसे आणता येईल, असा प्रयत्न केला पाहिजे, असे म्हटले. (वृत्तसंस्था)