डोनाल्ड ट्रम्प यांना करायचाय पंतप्रधान मोदींचा पाहुणचार - व्हाइट हाऊस
By Admin | Published: March 29, 2017 07:58 AM2017-03-29T07:58:35+5:302017-03-29T09:15:57+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी अमेरिकेचा दौरा करणार आहेत. या दौ-यादरम्यान ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 29 - पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी अमेरिकेचा दौरा करणार आहेत. या दौ-यादरम्यान ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाहुणचार करायचा आहे, यासाठी ते उत्सुक आहेत, असे व्हाइट हाऊसकडून बुधवारी सांगण्यात आले. मात्र. मोदींच्या दौ-याची तारीख अद्यापपर्यंत ठरलेली नाही.
याआधी, ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सुधारणा अजेंडाचे समर्थन करत भारतीयांप्रती आदरही यावेळी व्यक्त केला आहे. शिवाय,पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या दणदणीत यशबाबत ट्रम्प यांनी फोन करुन शुभेच्छाही दिल्या होत्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरुन आतापर्यंत तीन वेळा संपर्क झाला आहे.
28 मार्चला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी हल्लीच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या विजयाबद्दल मोदींचे अभिनंदन केले. व्हाइट हाऊसने हे वृत्त दिले. व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव शॉन स्पायसर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ट्रम्प यांनी मोदींना फोन करून निवडणुकीतील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने लक्षणीय यश मिळवले होते. या पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपाने सरकार स्थापन केले होते. मात्र पंजाबमध्ये भाजपाला काँग्रेसकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता.
या निवडणुका भाजपाने स्थानिक नेतृत्वाऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात लढवल्या गेल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दणदणीत यश मिळाले होते. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 14 वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन करण्यात भाजपाने यश मिळवले होते. मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीसारख्या कठोर निर्णयानंतर भाजपाला मिळालेले यश मोदींच्या नेतृत्वामुळे मिळाल्याचे मानले जात आहे.
यापूर्वी, ट्रम्प यांनी अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचा मोदींसोबत संपर्क झाला होता. यानंतर, ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर काही देशांच्या प्रमुखांसोबत बातचित केली होती, त्यात मोदींचाही समावेश होता. आणि 24 जानेवारी रोजी दहशतवादाविरोधात एकत्रितपणे लढण्यासंदर्भात या दोघांमध्ये बोलणी झाली होती.