पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 07:32 AM2024-09-22T07:32:47+5:302024-09-22T07:32:57+5:30
तीन दिवसांच्या अमेरिका भेटीवर रवाना झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी डेलावेअर येथे दाखल झाले
नवी दिल्ली : तीन दिवसांच्या अमेरिका भेटीवर रवाना झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी डेलावेअर येथे दाखल झाले. या दौऱ्यात ते क्वाड परिषदेत उपस्थित राहतील तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत आयोजित भविष्यविषयक शिखर परिषदेत ते सहभागी हाेतील. तत्पूर्वी मोदी यांनी ‘क्वाड’च्या रूपाने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतता, स्थैर्य आणि विकासाच्या दृष्टीने सुसंवादासाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे सांगितले.
‘क्वाड’ हा भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा गट असून, परस्पर सहकार्यातून विकास साध्य करण्याचा क्वाडच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे.
अमेरिकी अधिकाऱ्यांची शीख कार्यकर्त्यांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्यांनी देशातील प्रमुख शीख संघटनांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. प्रत्येक अमेरिकी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याची हमी या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली.
या बैठकीत अमेरिकन शीख कॉकस कमिटीचे प्रीतपालसिंह आणि शीख अमेरिकन लीगल डिफेन्स ॲण्ड एज्युकेशन फंडचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.