"पंतप्रधान नरेद्र मोदींच्या आर्थिक धोरणांमुळे भारतावर मंदीचा परिणाम नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 10:02 AM2023-01-22T10:02:59+5:302023-01-22T10:06:03+5:30
अश्विनी वैष्णव यांचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये वक्तव्य.
जगातील आर्थिक संकटाच्या काळात अनेक देश भारताच्या आर्थिक प्रगतीकडे पाहत आहेत. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) मध्येही भारताच्या कामगिरीचा डंका वाजला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये केंद्रीय रेल्वे आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताने गुंतवणुकीवर आधारित वाढीवर लक्ष केंद्रित केल्याचं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महासाथीच्या काळात पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.
“यामुळेच भारत महासाथीतून योग्यरित्या बाहेर येऊ शकला आणि भारतानं ६ टक्क्यांची वाढ नोंदवली. जेव्हा कोरोनाची महासाथ आली तेव्हा यामुळे आर्थिक आणि मानवी संकट निर्माण झालं. तेव्हा मोठ्या देशांनी प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करण्यास सुरूवात केली. यामुळे महागाईचा दबाव वाढला,” असं अश्विनी वैष्णव म्हणाले. २०२२ मध्ये डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून १,२१७५३ अब्ज रुपयांची देवाणघेवाण झाली. हे अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्सच्या एकूण ट्रान्झॅक्शनच्या ४ टक्के असल्याचेही ते म्हणाले.
सेमीकंडक्टर क्षेत्रावरही भाष्य
केंद्रीय दूरसंचार मंत्री पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने आपण जगाने इंडिया स्टॅकचा अवलंब करावा असा संदेश आणला आहे. उद्योन्मुख देशांपासून ते उद्योन्मुख कंपन्यांसाठी हा एक उत्तम डिजिटल उपाय आहे. एवढेच नाही तर हे ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, याचा अर्थ कोणीही त्याचा फायदा घेऊ शकतो.”
अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचाही कार्यभार आहे. WEF मधील दुसर्या सत्रात, त्यांनी देशातील वेगाने विकसित होत असलेल्या सेमीकंडक्टर इकोसिस्टमबद्दल देखील माहिती दिली. “येत्या ३ वर्षांत भारत दूरसंचार उपकरणांचा मोठा निर्यातदार असेल. आज हा देशातील एक मोठा उद्योग आहे. सुमारे ८७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आली आहे. अगदी Apple iPhone 14 भारतात बनवला जात आहे आणि सप्लाय चेन बदलत आहे,” असंही त्यांनी सांगितलं.