पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधील मुक्तीनाथ मंदिराला भेट देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 01:47 PM2018-05-11T13:47:52+5:302018-05-11T13:47:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनकपूर येथे जाऊन माता जानकीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जनकपूर ते अयोध्या अशा बससेवेला हिरवा झेंडाही दाखवला आणि भविष्यात रामायण सर्किटसाठी आपण प्रयत्न करु असे उपस्थितांना आश्वासन दिले.
काठमांडू- पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. शनिवारी ते मुक्तीनाथ मंदिराला भेट देणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी मुक्तीनात मंदिराजवळ सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनकपूर येथे जाऊन माता जानकीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जनकपूर ते अयोध्या अशा बससेवेला हिरवा झेंडाही दाखवला आणि भविष्यात रामायण सर्किटसाठी आपण प्रयत्न करु असे उपस्थितांना आश्वासन दिले.
उद्या शनिवारी ते मुक्तीनाथ मंदिराला भेट देणार असल्याने भारतीय सुरक्षारक्षकांनीही या परिसराला भेट देऊन व्यवस्थेची पाहाणी केली. याबाबत बोलताना मुख्य जिल्हा अधिकारी शिशिर राज पौडेल म्हणाले, सर्व जिल्ह्यामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून जिल्ह्याच्या सर्व 15 चेकपॉइंट्सवर सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात आलेली आहे. शुक्रवारी दुपारी 4 वाजल्यापासून शनिवारी दुपारपर्यंत मुक्तीनाथ मंदिरात भाविकांना देवदर्शन थांबविण्याचा निर्णय जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुक्तीनाथ मंदिराच्या भेटीची सुरक्षा व्यवस्था नेपाळ पोलीस. नेपाळ पोलीस दल, नेपाळी लष्कराने स्वीकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या शिष्टमंडळासह मुक्तीनाथ मंदिरात येणार असल्यामुळे मंदिराजवळच 5 हेलिपॅड्स तयार करण्यात आले आहेत. या मंदिरात पंतप्रधानांच्या भेटीमुळे विशेष पुजेचे आयोजन करण्यात आले आहे.
आता दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडू येथे जाणार असून तेथे नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची ते भेट घेणार आहेत तसेच ते उपराष्ट्रपती नंदा बहादूर पन यांचीही भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी नेपाळचे पंतप्रधान के. पी ओली यांच्याबरोबर शिष्टमंडळासह विविध विषयांवर चर्चा करतील. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान अनेक करारांवर स्वाक्षरी करतील अशी माहिती देण्यात येत आहे. तसेच 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेल्या अरुण 3 प्रकल्पाचे ते उद्घाटन करतील. या प्रकल्पातून 900 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्माण होणार आहे.