ब्रिक्समध्ये पंतप्रधान मोदींच्या हाती मोठं यश, चीनच्या धरतीवरुन पाच देशांचा पाकिस्तानला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 01:18 PM2017-09-04T13:18:37+5:302017-09-04T16:19:07+5:30
ब्रिक्स घोषणापत्रात सांगण्यात आलं आहे की, 'जगात कुठेही, कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला मंजूर नाही. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही'.
बीजिंग, दि. 4 - ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठं यश मिळालं आहे. ब्रिक्सच्या घोषणापत्रात सर्व प्रकारच्या दहशतवाद्याचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी थेट पाकिस्तानचं नाव घेण्यात आलेलं नाही, मात्र पाकिस्तानच्या जमिनीवर उभ्या असलेल्या दहशतवादी संघटनांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. भारतासाठी हे एक मोठं यश आहे. कारण घोषणापत्रात जे काही लिहिण्यात येतं त्यावर बिक्स देशांची सहमती असते. भारताने याआधी अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणा-या समर्थनाचा निषेध केला आहे. ब्रिक्स देशांच्या पाठिंब्यामुळे भारताचा दावा मजबूत झाला आहे.
All #BRICS leaders strongly condemned terrorism in all its forms, called for greater efficiency in designation of terrorists: Preeti Saran pic.twitter.com/vwfMfsAeDQ
— ANI (@ANI) September 4, 2017
या घोषणापत्रात सांगण्यात आलं आहे की, 'जगात कुठेही, कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला मंजूर नाही. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही'. यावेळी लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि तालिबानी यांचा स्पष्ट उल्लेख करत निषेध करण्यात आला आहे. यामध्ये अल-कायदा, हक्कानी आणि इसिसचाही उल्लेख होता.
You cannot have double standards, what came out today acknowledged we must come together in handling it: Saran, MEA on terrorism #BRICS2017pic.twitter.com/cEbLvBqu2Y
— ANI (@ANI) September 4, 2017
'दहशतवादाला समर्थन देणा-यांना उत्तर देण्यासाठी भाग पाडणं गरजेचं आहे. दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय स्वतरावर मदत गरजेची आहे. तसंत दहशतवादी संघटनांना होणारी आर्थिक मदतही थांबवली पाहिजे', असंही घोषणापत्रात सांगण्यात आलं आहे.
Leaders called on states to prevent financing of terrorist networks & terrorist actions from their territories: Preeti Saran #BRICS2017pic.twitter.com/Z99rwyVL0U
— ANI (@ANI) September 4, 2017
ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शांतता आणि विकासासाठी सहकार्याचं आवाहन केलं आहे. 'शांती आणि विकासासाठी ब्रिक्स देशांनी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं आहे', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. मोदींनी यावेळी बोलताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि चीनकडून त्यांना मिळणारा आश्रय यासंबंधी थेट उल्लेख केला नसला, तरी त्यांच्या या वक्तव्याने अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचं तज्ञ सांगत आहेत.
दुसरीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी, 'आम्हा पाच देशांमध्ये मतभेद असले तरी आमचा विकास त्याच गतीने आणि त्याच कारणांमुळे होत आहे.आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासाच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकजुटीने आवाज उठवत, समस्यांवरही एकत्रितपणे मार्ग काढला पाहिजे', असं आवाहन केलं.
मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -
- विकासासाठी ब्रिक्स देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि इनोव्हेशनची आवश्यकता आहे. शांती आणि विकासासाठी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं.
- आम्ही गरिबी हटवण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहोत. ज्यामुळे आरोग्य, स्वच्छता, तांत्रिक कौशल्य, अन्न सुरक्षा, लैंगिक समानता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकेल.
- ब्रिक्सच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या एनडीबीने देशांच्या दिर्घकालीन विकासासाठी कर्ज देण्यास सुरुवात केली पाहिजे.
- आम्ही काळ्या पैशाविरोधात लढा पुकारला आहे. स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. भारत गरिबीशी लढा देत आहे. पुढील दशक अत्यंत महत्वाचं असणार आहे. ब्रिक्स देशांवर बदलाची जबाबदारी आहे.
- भारत एक तरुण देश आहे, आणि हीच आमची ताकद आहे. भारतातील 80 कोटी तरुण आमची ताकद आहेत. स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने पुढील दशक अत्यंत महत्वाचं आहे.