पंतप्रधानांचा आखाती देशांचा आणि पश्चिम आशियाचा पाचवा दौरा, पॅलेस्टाइन भेटीकडे सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 11:52 AM2018-02-09T11:52:37+5:302018-02-09T12:22:37+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते १२ फेब्रुवारी या चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. २०१५ पासून पश्चिम आशिया आणि आखाती देशांचा त्यांचा हा पाचवा दौरा आहे.
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते १२ फेब्रुवारी या चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. २०१५ पासून पश्चिम आशिया आणि आखाती देशांचा त्यांचा हा पाचवा दौरा आहे. १० फेब्रुवारी रोजी ते पॅलेस्टाइन भेटीवर जात असून ते जॉर्डनमार्गे पॅलेस्टाइनमध्ये प्रवेश करतील. पॅलेस्टाइनला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील.
I will be undertaking bilateral visits to Palestine, United Arab Emirates and Oman from 9th to 12th February. The Gulf and West Asian region is a key priority in our external engagement. We enjoy vibrant multi-dimensional ties with the countries there.
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2018
२०१४ नंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इस्रायलभेटीनंतर पॅलेस्टाइनला भेट दिली होती. मात्र गेल्या वर्षी इस्रायलला दौऱ्यावर गेले असताना नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाइनला जाणे टाळले होते. त्यामुळे त्य़ांच्यावर भारतातून आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन टीका झाली होती. मात्र आता पॅलेस्टाइनला जाण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे हा तणाव निवळेल अशी अपेक्षा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट केवळ राजकीय नाही तर मानवतावादी दृष्टीकोनातून केलेला दौरा असेल असे मत काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. आरोग्य, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास अशा विविध विषयांवर पॅलेस्टाइनशी करार होण्याची शक्यता आहे. रामल्लामध्ये १०० खाटांचे रुग्णालय बांधण्याची घोषणाही पंतप्रधान करतील अशी शक्यता आहे. तसेच पॅलेस्टाइनमध्ये भारतातर्फे शाळा बांधण्याची घोषणा ते करतील. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या ठरावाला भारताने संयुक्त राष्ट्रात विरोध करुन याआधीच पॅलेस्टाइनबाबत आपली भूमिका कायम असल्याचे सिद्ध केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यापासून भारत आणि इस्रायल यांचे संबंध झपाट्याने वाढत गेले यामुळे पॅलेस्टाइनवासीयांच्या मनामध्ये भारताबाबत साशंकता निर्माण होणे साहजिक होते. मात्र आता पंतप्रधानांच्या पॅलेस्टाइनभेटीमुळे ही साशंकता कमी होण्याची शक्यता आहे.
Prime Minister Narendra Modi embarks on three nation visit to Palestine, Oman and the UAE. pic.twitter.com/HhTYMAu7Ld
— ANI (@ANI) February 9, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम जॉर्डनमध्ये जातील. तेथे जॉर्डनचे राजे अब्दुल्ला (द्वितिय) यांची भेट घेऊन हेलिकॉप्टरने ते रामल्ला येथे जातील. शनिवार सकाळी ते यासर अराफात संग्रहालयाला भेट देतील. १०- ११ फेब्रुवारी या दिवसांमध्ये ते संयुक्त अरब अमिरातीला भेट देतील आणि ११-१२ फेब्रुवारी या काळात ते ओमानला जातील. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असताना पहिल्यांदाच ओमानला जात आहेत. ओमानचे सुलतान आणि इतर नेत्यांशी ते विविध विषयांवर चर्चा करतील.