पंतप्रधान कार्यालयातील आलिशान गाड्यांचा लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 01:39 AM2018-09-18T01:39:57+5:302018-09-18T06:45:07+5:30
इम्रान खान रोखणार उधळपट्टी; पाकिस्तानला मिळाले २00 कोटी रुपये
इस्लामाबाद : देश चालवण्यासाठी सरकारकडे पैसाच नाही, असे स्पष्टपणे सांगणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काटकसरीचा भाग म्हणून पंतप्रधान कार्यालयातील १०२ अतिआलिशान कार्सचा जो लिलाव जाहीर केला, त्याला पहिल्याच दिवशी, सोमवारी भरघोस प्रतिसाद मिळाला. लिलावात ७० कार्स ठरल्यापेक्षा अधिक रकमेत विकल्या गेल्या.
या आलिशान कार्सच्या विक्रीतून सरकारला २०० कोटी रुपये मिळतील, असा दावा मंत्री फवाद चौधरी यांनी केला. २४ मर्सिडिझ बेंझ, आठ बुलेटप्रुफ बीएमडब्ल्यू, ५००० सीसीच्या तीन व ३००० सीसीच्या दोन एसयूव्ही याही लिलावात आहेत. याशिवाय टोयोटा, लेक्सस, लँडक्रूझर, सुझुकी, मित्सुबिशी, होंडा, जीप अशी सर्व वाहने आजच्या लिलावात ठेवण्यात आली होती. काही बॉम्ब व बुलेटप्रुफ दुसऱ्या टप्प्यात लिलावात विक्रीला ठेवण्यात येणार आहेत.
८ म्हशीही विकणार
माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपल्या निवासस्थानी ८ म्हशीही पाळल्या होत्या. म्हशी पाळणे हे पंतप्रधानाचे काम नाही. त्यामुळे त्यांचीही लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे, असे मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले.