'पंतप्रधान निवासस्थान भाड्यानं देणे आहे'; दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 08:33 AM2021-08-04T08:33:51+5:302021-08-04T08:35:53+5:30
Pakistan PM Imran Khan : पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय. यापूर्वी एका लग्नसमारंभासाठीही भाड्यानं देण्यात आलं होतं पंतप्रधानांचं निवासस्थान.
Pakistan PM Imran Khan : मोठ्या आर्थिक संकाटतून जात असलेल्या आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानचेपंतप्रधानइम्रान खान यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तानच्यापंतप्रधानांचं इस्लामाबाद येथे असलेल्या सरकारी निवासस्थानाला रियल स्टेट क्षेत्रात भाड्यानं दिली जाण्याची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानातील समा टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानातील सत्तारूढ पक्ष तहरीक-पाकिस्तान तहरीक-ए-एन्साफनं (पीटीआय) ऑगस्ट २०१९ मध्ये पंतप्रधानांचं निवासस्थान एका विद्यापीठात बदलण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान इम्रान खान यांनी आपलं ते निवासस्थान रिकामं केलं आहे. परंतु आता या योजनेत एक बदल करण्यात आला आहे. सरकारी खजान्यात उत्पन्न जमा होण्यासाठी त्यांनी ते निवासस्थान आता भाड्यानं देण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळानं यापूर्वी पंतप्रधान निवासस्थान विद्यापीठात बदलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु स्थानिक मीडियानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार इस्लामाबाद येथील रेड झोनमध्ये असलेलं हे निवासस्थान आता सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो, शैक्षणिक आणि अन्य कार्यक्रमांसाठी भाड्यानं देण्यात येणार आहे. तसंच यासाठी दोन समितींची स्थापना करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. याशिवाय मंत्रिमंडळ पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून उत्पन्न कसं मिळवता येईल यावरही विचार करत आहे.
२०१९ मध्ये तत्कालिन शिक्षण मंत्री शफकत महमूद यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या निवासस्थानच्या देखभालीचा खर्च ४ कोटी ७० लाख रूपये होता. यासाठी इम्रान खान यांनी निवासस्थान रिकामं केलं आणि विद्यापीठात बदलण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लाहोर येथील गव्हर्नर हाऊसदेखील संग्रहालय आणि आर्ट गॅलरीच्या रूपात बदलण्यात येणार आहे. तसंच मुर्री येथील पंजाब हाऊस पर्यंटकांसाठी तसंच कराची येथील गव्हर्नर हाऊस संग्रहालयाच्या रूपात वापरण्यात येणार असल्याचं महमूद यांनी नमूद केलं.
लग्नासाठीही देण्यात आलं होतं निवासस्थान
२०१९ मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं निवासस्थान एका लग्नसमारंभासाठीही भाड्यानं देण्यात आलं होतं. दरम्यान, तो लग्नसोहळा ब्रिगेडीयर वसीम इफ्तियार चीमा यांची कन्या अनम वसीम हीचा होता. या समारंभात इम्रान खानदेखील सहभागी झाले होते.