पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे भारत- इस्रायल संबंध दृढतेच्या दिशेने
By Admin | Published: July 1, 2017 02:12 PM2017-07-01T14:12:07+5:302017-07-01T16:14:41+5:30
गेल्या सत्तर वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मुंबई, दि.1- 3 जुलैपासून पंतपप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या बहुचर्चित दौऱ्यावर जात आहेत. गेल्या सत्तर वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे इस्रायलमधील माध्यमे आणि लोकांमध्ये या दौऱ्याबद्द्ल जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील असे मत इस्रायली आणि भारतीय माध्यमांनी व्यक्त केले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीही आपण या दौऱ्याबाबत आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत उत्सुक असल्याचे सांगितले. यापुर्वी दोन्ही नेत्यांची विविध आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर भेट झालेली आहे.
भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये शेती, पशुपालन, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यापारी संबंध आहेत. मौल्यवान खडे, तंत्रज्ञान, रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, प्लास्टीक, खते, कपडे, औषधे अशा अनेक वस्तूंची आयात निर्यात हे देश करत असतात. या दोन्ही देशांनी २०१४ साली ४.५२ अब्ज डॉलर्सचा व्यापार (संरक्षण क्षेत्रातील खरेदी-विक्री वगळून) केला आहे. इस्रायलमध्ये तयार होणारे संरक्षण साहित्य खरेदी करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे.
भारत आणि इस्रायल यांचे संबंध आज इतक्या वेगाने सुधारत असले तरी हा वेग गेल्या 70 वर्षांमध्ये कायम नव्हता. 1947 साली पॅलेस्टाइनचे विभाजन करण्याविरोधात भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये मत दिले होते. त्याचप्रमाणे इस्रायलच्या यूएनमधील प्रवेशासही भारताने 1949 साली विरोध केला होता. 1950 साली भारताने इस्रायलला कायदेशीर मान्यता दिली. याबाबत बोलताना भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु म्हणाले होते, ही मान्यता आम्ही यापुर्वीच देऊ शकलो असतो, पण मध्यपुर्वेतील आमच्या अरब मित्रांना न दुखावण्याची आमची इच्छा होती. 1953 साली इस्रायलला मुंबईत वाणिज्य दुतावास उघडण्याची परवानगी मिळाली. 1950 ते 1990 या काळात भारत आणि इस्रायल यांचे संबंध अनौपचारिक स्वरुपाचे राहिले. अर्थात या काळामध्ये विविध आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर दोन्ही देशांचे नेते भेटत होतेच. 1992 साली दोन्ही देशांनी मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित केले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन भारतात आले, त्यानंतर हे संबंध अधिक वाढीस लागले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने ते सर्वाधीक चांगल्या स्थितीत आहेत असे म्हणावे लागेल.
भारत-इस्रायल यांच्यांमधील राजनैतिक संबंध
1992दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित
1997- इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट
2000- उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांची इस्रायलला भेट
2003- इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांची भारतास भेट
2006- तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार, कपिल सिब्बल, कमलनाथ यांची इस्रायल भेट
2012- परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची इस्रायलला भेट
2014- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू यांची न्यू यॉर्कमध्ये भेट.
2014- ट्वीटरवर नरेंद्र मोदी यांनी हिब्रूमधून हनुक्का या ज्यू सणाच्या शुभेच्छा दिल्या, त्याला नेत्यानाहूंचा हिंदीतून प्रतिसाद
2014- गृहमंत्री राजनाथ सिंह यांची इस्रायलला भेट
2015- इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे यालोन यांची भारत भेट (पंतप्रधानांशीही संवाद)
2015- भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पॅलेस्टाइन आणि इस्रायलला भेट. इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण. असे भाषण देणारे व इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती
2016 - जानेवारी महिन्यामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्रायलला भेट दिली. यावेळेस इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी चर्चा केली.
2016- नोव्हेंबर महिन्यामध्ये इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियुविन रिवलिन यांनी भारताला भेट दिली. यावेळेस त्यांनी मुंबईत खाबाद हाऊसलाही भेट दिली.