प्रिन्स हॅरीनं स्वत:च आपला ‘पत्ता’ कट केला! ब्रिटनचं राजघराणं पुन्हा एकदा चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 05:57 AM2024-04-22T05:57:34+5:302024-04-22T05:58:16+5:30
प्रिन्स हॅरीनं आपलं आत्मचिरत्र ‘स्पेयर’मध्येही राजघराण्याविषयी मोठी टीका केली होती. त्यानंतर प्रिन्स हॅरी आणि त्यांचे पिता किंग चार्ल्स यांच्यात जोरदार खटके उडाले होते
ब्रिटनचं राजघराणं आपल्या प्रतिष्ठेसाठी जितकं प्रसिद्ध आहे, त्यापेक्षा जास्त ते त्यांच्यातील वादविवादांमुळे प्रसिद्ध आहे. पण या राजघराण्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रतिष्ठेच्या कारणानं असो किंवा वादांच्या कारणामुळे, या राजघराण्याचं नाव कायम जगभरात गाजत असतं. कारण कोणतंही असो, या राजघराण्यावर लोकांचं प्रेम आहे आणि त्यांच्याविषयी, त्यांच्या अंतर्गत भानगडींविषयी जाणून घेण्यात केवळ ब्रिटनलाच नव्हे, तर अख्ख्या जगभरातील लोकांना रस आहे. त्यामुळे राजघराण्यात थोडं जरी खुट्टं झालं तरी ती बातमी लोक चवीनं चघळतात.
ब्रिटिश राजघराण्यातील कौटुंबिक वाद, राजघराण्यातील व्यक्ती, त्यांचे वैवाहिक किंवा विवाहबाह्य संबंध, इतकंच काय, ते जिथे कुठे जातील आणि ते जे काही करतील, ती प्रत्येक गोष्ट जगासाठी औत्सुक्याची असते. प्रिन्सेस डायना, त्यांचे विवाहबाह्य संबंध, पॅपाराझ्झींनी त्यांचा केलेला पाठलाग, त्यांचा मृत्यू.. या साऱ्या घटना तर एकेकाळी इतक्या गाजल्या की त्यावेळी संपूर्ण जगात तोच सर्वाधिक चर्चेचा विषय होता. वेळोवेळी या राजघराण्यानं लोकांना अनेक खमंग बातम्या पुरवल्या आहेत.
यावेळी ब्रिटिश राजघराणं पुन्हा चर्चेत आहे, ते प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांच्यामुळे. या दाम्पत्याचे राजघराण्याशी संबंध चांगले नाहीत आणि राजघराण्याशी असलेलं त्यांचं नातं त्यांनी अधिकृतपणे तोडलं असलं तरी प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांचा अधिकृत पत्ता आजपर्यंत ब्रिटनमधील बकिंगहॅम पॅलेस हाच होता. मात्र नुकतंच आता अचानक उघड झालं आहे की प्रिन्स हॅरीनं आता अधिकृतपणे ब्रिटनमधील आपलं ‘घर’ सोडलं आहे. प्रिन्स हॅरी यांनी आपल्या अधिकृत पत्त्यामधून ब्रिटनमधील आपल्या नेहमीच्या घराचा पत्ता बदलला असून, स्थायी पत्ता म्हणून अमेरिकेतील एका ठिकाणाची नोंद केली आहेे. माध्यमांच्या ‘सतर्कतेमुळे’ ही बातमी ‘लीक’ झाली आहे. पर्यटनाशी संबंधित एका दस्तावेजामध्ये प्रिन्स हॅरी यांनी ‘प्रायमरी ॲड्रेस’ म्हणून कॅलिफोर्निया येथील ठिकाणाची नोंद केली आहे.
राजघराण्याशी वादानंतर प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी राजघराणं सोडलं असलं तरी आतापर्यंत त्यांचा स्थायी पत्ता म्हणून ब्रिटन येथील फॉगमोर काॅटेजचाच पत्ता देण्यात आलेला होता. तो शेवटचा संबंधही त्यांनी आता तोडला आहे. फॉगमोर काॅटेज म्हणजे तेच शाही घर, जे हॅरी आणि मेगन मर्केल यांच्या २०१८मध्ये झालेल्या विवाहानंतर राणी एलिझाबेथ यांनी त्यांना गिफ्ट केलं होतं. पण त्यानंतर हॅरी आणि राजघराण्याचे संबंध बिघडले. मार्च २०२१मध्ये हॅरी आणि मेगन मर्केल यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राजघराण्यावर उघड उघड आरोप केले होते. मेगन यांनी तर राजघराण्यावर वंशवादाचा आरोप करताना म्हटलं होतं, त्यांचा मुलगा आर्ची ‘प्रिन्स’ बनू नये यासाठी राजघराण्यानं आटापिटा चालवला होता. त्याच्या जन्माच्या आधी त्यांना सर्वांत मोठी भीती ही होती की जन्मानंतर त्याचा वर्ण ‘काळा’ असू नये!
प्रिन्स हॅरीनं आपलं आत्मचिरत्र ‘स्पेयर’मध्येही राजघराण्याविषयी मोठी टीका केली होती. त्यानंतर प्रिन्स हॅरी आणि त्यांचे पिता किंग चार्ल्स यांच्यात जोरदार खटके उडाले होते. त्यामुळेच प्रिन्स हॅरी यांना घर सोडून जाण्यास सांगण्यात आलं होतं. मेगन यांनी मुलाखतीत सांगितलं होतं, शाही राजघराण्यात लग्न केल्यामुळे आपल्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल होईल असं मला वाटलं होतं; पण झालं उलटंच, माझं स्वातंत्र्य इतकं संकुचित झालं की मला घराबाहेर पडणंही मुश्कील झालं. राजघराण्यात मी अक्षरशः एकाकी पडले. मित्रमैत्रिणींबरोबर साधं ‘लंच’ला जाण्यासाठीही मला परवानगी नव्हती. एक वेळ तर अशी आली होती की मी आतून पूर्णत: मोडून पडले होते. मी नैराश्यात गेले होते. माझी जगण्याची इच्छाच पूर्णतः मेली होती. आत्महत्येच्या विचारांनी डोक्यात थैमान घातलं होतं. माझी सर्वात मोठी चूक ही होती की मी राजघराण्यावर विश्वास ठेवला. मी इथे सुरक्षित असेन, असा विश्वास मला देण्यात आला होता; पण तसं कधीच घडलं नाही.प्रिन्स हॅरीनंही मुलाखतीत म्हटलं होतं, माझ्या पत्नीविषयी मला अतिशय गर्व आहे. जे काही तिनं सोसलं, सहन केलं, त्यासाठी छाती हिंमतवान माणसाचीच असली पाहिजे!..
राजघराण्याचे वाभाडे
प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी २०२०मध्ये राजघराण्याशी संबंध तोडल्यानंतर शाही राजघराण्याशी त्यांचे संबंध आणखीच बिघडले होते. त्यानंतर गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर आलेल्या प्रिन्स हॅरी यांच्यावरील डॉक्युमेंट्रीनं ब्रिटिश राजघराण्याचे अक्षरशः वाभाडे काढले. आता राजघराण्याच्या आणखी एका फोटोवरून नवा वाद रंगला आहे. ‘केट गेट’ प्रकरण म्हणून सध्या ते चर्चेत आहे. या फोटोत डिजिटली अफरातफर केली गेल्याचा आरोप होत आहे.