प्रिन्स हॅरीचे भविष्य ट्रम्प यांच्यावर अवलंबून; अमेरिकेत बेकायदा वास्तव्य, व्हिसा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 07:21 IST2025-02-15T07:20:17+5:302025-02-15T07:21:55+5:30

प्रिन्स हॅरी यांना अमेरिकेत राहण्यासाठी व्हिसा मिळणार का? तो न मिळाल्यास अमेरिकन सरकार म्हणजे ट्रम्प प्रशासन काय भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत.

Prince Harry's future depends on Donald Trump; Illegal stay in US, no visa | प्रिन्स हॅरीचे भविष्य ट्रम्प यांच्यावर अवलंबून; अमेरिकेत बेकायदा वास्तव्य, व्हिसा नाही

प्रिन्स हॅरीचे भविष्य ट्रम्प यांच्यावर अवलंबून; अमेरिकेत बेकायदा वास्तव्य, व्हिसा नाही

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांच्या घटस्फोटित पत्नी लेडी डायना यांचा मृत्यू कसा झाला, हे आठवते? १९९७ साली प्रियकरासह कारने प्रवास करत असताना काही फोटोग्राफर्स त्यांचा पाठलाग करत होते. तत्कालीन राजकुमार असलेल्या चार्ल्सच्या पत्नीचे तिच्या प्रियकरासोबतचे फोटो त्यांना हवे होते. त्यांना चुकवत एका बोगद्यातून कार जात असताना तिला अपघात झाला आणि त्यात लेडी डायना, तिचा प्रियकर व ड्रायव्हर, असे तिघेही जण मरण पावले.

हे आठवण्याचे कारण म्हणजे प्रिन्स चार्ल्स व लेडी डायना यांचे पुत्र प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेघन मार्कल यांच्याविषयी अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य आणि त्यामुळे सुरू झालेला वाद. प्रिन्स हॅरीला अमेरिकेने अद्याप व्हिसा दिलेला नाही. तरीही त्याला बेकायदा स्थलांतरित लोकांप्रमाणे ब्रिटनला पाठवणार नाही. ‘तो गरीब बिचारा आहे. त्याची पत्नी मात्र भयंकर आहे’, असे ट्रम्प म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे झालेला वाद ब्रिटनच्या राजघराण्यापर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

प्रिन्स हॅरी व त्यांची पत्नी मेघन मार्कल यांनी राजघराण्याचा त्याग करून सामान्यांप्रमाणे जगण्याचा निर्णय घेतला. मेघन मार्कल ही हॉलिवूडमधील अभिनेत्री. ती अमेरिकन. तिची आई आफ्रिकन व वडील अमेरिकन. ती मिश्र वंशाची असल्याने ब्रिटनच्या राजघराण्यात नाराजी व्यक्त झाली होती. एवढेच नव्हे, तर राजघराण्यातील मंडळींचे या दाम्पत्याशी संबंध बिघडले वा संपले होते. त्यामुळे हे दोघे मुलांसह ब्रिटन सोडून कॅनडामध्ये गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी राजघराण्यावर अनेक आरोप केले होते. त्यांचे राहण्याचे ठिकाण सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त ठेवले होते; पण कोविडच्या काळात फोटोग्राफर्सना त्यांचा सुगावा लागला आणि ते अमेरिकेत राहायला आले.  

मेघन मार्कल अमेरिकनच आहे; पण प्रिन्स हॅरी ब्रिटनचे नागरिक, शिवाय राजघराण्याशी संबंधित. मात्र, त्यांना अमेरिकेने अद्याप व्हिसा दिलेला नाही. तरीही ते तिथे राहत आहेत. प्रिन्स हॅरी व मेघन मार्कल, हे दोघे डोनाल्ड ट्रम्पचे टीकाकार. मेघन मार्कल यांनी तर ट्रम्प यांच्यावर कडक शब्दांत टीकाही केली होती; पण ट्रम्प तिला काहीच करू शकत नाहीत. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या प्रिन्स हॅरीला मात्र व्हिसा नसल्याने परत पाठवण्याचा निर्णय होऊ शकतो. 

आपण पूर्वी अनेक व्यसने करायचो, कोकेन, गांजा, तसेच विशिष्ट प्रकारचे मशरूम यांचे आपणास पूर्वी व्यसन होते, असे प्रिन्स हॅरी यांनी लिहून ठेवले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नियमाप्रमाणे त्यांना व्हिसा देऊ नये, अशी याचिका एका संस्थेने न्यायालयात केली आहे. त्यावर अद्याप निर्णय व्हायचा आहे. सध्याही ते कोणत्या व्हिसावर राहत आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. न्यायालय काय निर्णय देणार? प्रिन्स हॅरी यांना अमेरिकेत राहण्यासाठी व्हिसा मिळणार का? तो न मिळाल्यास अमेरिकन सरकार म्हणजे ट्रम्प प्रशासन काय भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र प्रिन्स हॅरी यांना दिलासा दिला आहे. त्यांना मायदेशी परत पाठवणार नाही, असे ते म्हणाले आहेत. ब्रिटिश राजघराण्यातील राजकुमारावर ट्रम्प यांचा वरदहस्त आहे; पण मेघन मार्कल भयंकर आहे, असे म्हटल्याने ब्रिटिश लोक त्यांच्यावर नाराज आहेत.

Web Title: Prince Harry's future depends on Donald Trump; Illegal stay in US, no visa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.