प्रिन्स विल्यम्स-केटला कन्यारत्न
By admin | Published: May 2, 2015 11:14 PM2015-05-02T23:14:56+5:302015-05-02T23:14:56+5:30
प्रिन्स विल्यम्स यांची दुसऱ्या अपत्याची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. त्यांच्या पत्नी आणि डचेस आॅफ केम्ब्रिज केट मिडलटन यांनी शनिवारी
लंडन : प्रिन्स विल्यम्स यांची दुसऱ्या अपत्याची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली. त्यांच्या पत्नी आणि डचेस आॅफ केम्ब्रिज केट मिडलटन यांनी शनिवारी गोंडस मुलीला जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण दोन्हीही सुखरूप असल्याचे राजघराण्याकडून सांगण्यात आले.
केनसिंग्टन पॅलेसने दिलेल्या निवेदनानुसार, स्थानिक प्रमाणवेळेनुसार, सकाळी ८ वाजून ३४ मिनिटांनी मुलीचा सुखरूप जन्म झाला. ड्यूक आॅफ केम्ब्रिज, प्रिन्स विल्यम्स आपल्या मुलीच्या जन्मावेळी उपस्थित होते. मुलीचे वजन ३.७ किलो आहे. पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार, डचेस आॅफ केम्ब्रिज केट यांना आज सकाळी प्रसूतिकळा सुरू झाल्यानंतर लंडन येथील सेंट मेरी रुग्णालयाच्या लिंडो कक्षात दाखल करण्यात आले. याच ठिकाणी त्यांचा पहिला मुलगा प्रिन्स जॉर्ज याचा जुलैै २०१३ मध्ये जन्म झाला होता.
राजघराण्याचे सुरक्षा अधिकारी आधीपासूनच रुग्णालयात तैनात होते.
स्त्रीरोगतज्ज्ञ गाई थोर्पे- बीस्टन केट यांच्या प्रकृतीची देखरेख करीत आहेत. त्यांच्यासह महाराणीचे शल्यचिकित्सक अॅलन फार्थिंग हेदेखील प्रसूती कक्षात उपस्थित होते. बंकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर माहितीफलकावर पारंपरिक पद्धतीने राजघराण्यातील नव्या राजकन्येच्या जन्माची घोषणा करण्यात येणार आहे.
केट आणि विलियम यांनी केटच्या गर्भातील बाळ मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेतले नव्हते. मात्र, सट्टेबाज मुलगीच जन्माला येण्याची शक्यता वर्तवीत होते. रुग्णालयाबाहेर तळ ठोकून असलेल्या राजघराण्याच्या चाहत्यांनी मुलीच्या जन्माची आनंदवार्ता कळताच एकच जल्लोष केला. (वृत्तसंस्था)