ऑस्ट्रेलियातील क्रूझवर आढळले 800 लोक कोरोना पॉझिटिव्ह!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 02:36 PM2022-11-13T14:36:57+5:302022-11-13T14:37:31+5:30
COVID-19 cases : न्यूझीलंडहून परतलेल्या मॅजेस्टिक प्रिन्सेस क्रूझमध्ये 4 हजारांहून अधिक लोक होते.
कोरोना व्हायरसचा कहर अद्याप संपलेला नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील एका क्रूझवर असलेल्या लोकांची कोरोना संसर्गाची तपासणी केली असता धक्कादायक परिणाम समोर आले. या क्रूझवरील जवळपास 800 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडहून परतलेल्या मॅजेस्टिक प्रिन्सेस क्रूझमध्ये 4 हजारांहून अधिक लोक होते.
रिपोर्ट्सनुसार, प्रिन्सेस क्रूझने हे हॉलिडे क्रूझ असल्याचे म्हटले आहे. हॉलिडे क्रूझवरील सर्व लोकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 800 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. टेस्टनंतर रुग्णांना आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे. तसेच, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून नका, असा इशाराही देण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पच्या म्हणण्यानुसार, क्रूझवर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांना क्रूझवरच 5 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच, प्रिन्सेस क्रूझने एका निवेदनात म्हटले आहे की, आमची क्रूझवरील मेडिकल टीम प्रवाशांसोबत आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
याचबरोबर, कंपनीने सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह लोकांना क्वारंटाइन सेंटरपर्यंत पोहोचण्यास मदत केली जाईल. मॅजेस्टिक प्रिन्सेस क्रूझ सिडनीनंतर ऑस्ट्रेलियातील दुसरे सर्वात मोठे शहर मेलबर्नला रवाना होणार होती.
दरम्यान, न्यू साउथ वेल्समधील अधिकाऱ्यांनी या आठवड्यात सांगितले होते की, आजकाल कोरोना रुग्णांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. कोरोना महामारीची नवी लाट जाणवू शकते. तसेच, काही वैद्यकीय तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव आगामी सुट्ट्यांमध्ये पुन्हा वाढू शकतो. जो देशाच्या आरोग्य व्यवस्थेला आव्हान देऊ शकतो.