बाबो! दुबईच्या शासकाला महागात पडला घटस्फोट, सहावी पत्नी हयाला द्यावे लागतील इतके कोटी रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 12:04 PM2021-12-22T12:04:31+5:302021-12-22T12:05:28+5:30
Mohammed bin Rashid Al Maktoum and Haya bint Hussein Divorce : संयुक्त अरब अमीरातचे पंतप्रधान आणि दुबईचे अब्जाधीश उद्योगपती शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूस आणि त्यांची सहावी पत्नी राहिलेली राजकुमारी हया यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे.
दुबईचा (Dubai Royale Family) शाही परिवार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संयुक्त अरब अमीरातचे पंतप्रधान आणि दुबईचे अब्जाधीश उद्योगपती शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूस ((Mohammed bin Rashid Al Maktoum) आणि त्यांची सहावी पत्नी राहिलेली राजकुमारी हया यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे. ब्रिटनच्या एका कोर्टाने यासंबंध निर्णय सुनावला आहे. त्यानुसार दुबईच्या शासकाला राजकुमारी हयाला (Haya bint Hussein) ५५ कोटी पाउंडची मोठी रक्कम देण्याचा आदेश सुनावला आहे.
भारतीय करन्सीनुसार ही रक्कम साधारण ५५०० कोटी रूपये इतकी होती. ब्रिटनच्या कायद्याच्या इतिहासात घटस्फोटाची ही सर्वात घटना मानली जात आहे. ब्रिटन हायकोर्टाने मंगळवारी यासंबंधी निर्णय सुनावला. ज्यात कोर्टाने सांगितलं की, राजकुमारी हया आणि तिच्या मुलांना दहशतवाद किंवा अपहरण अशा धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. यासाठी त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी. जॉर्डनचे माजी राजा हुसैन बिन तलाल यांची ४७ वर्षीय मुलगी राजकुमारी हया बिंत अल-हुसैन दुबईचा शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम(७२) याची सहावी आणि सर्वात लहान पत्नी होती.
२००४ मध्ये झाला होता निकाह
दुबईचा शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम सोबत तिचा निकाह २००४ मध्ये झाला होता. त्यावेळी त्याच्या आधीच पाच पत्नी होत्या. राजकुमारी हया आणि दुबईच्या शासकाला दोन मुलंही आहेत. मुलीचं वय १४ तर मुलगा ९ वर्षांचा आहे. शेखची सहावी पत्नी राजकुमारी हया एप्रिल २०१९ मध्ये अचानक दोन्ही मुलांसह दुबई सोडून ब्रिटनला पळून आली होती. तिथे तिने तिच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले. ती म्हणाली होती की, तिच्या जीवाला धोका आहे.
जॉर्डनची राजकुमारी हयाचा जन्म याच देशात झाला होता. पण ती केवळ तीन वर्षांची असताना एका हेलिकॉप्टर अपघातात तिच्या आईचं निधन झालं होतं. ज्यानंतर ती ब्रिटनमध्ये लहानाची मोठी झाली. इथे तिने ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीतून राज्यशास्त्र, अर्थशास्त्राचा अभ्यास केला. तिला दुबईतील बंदीस्त जीवन पसंत नव्हतं. अखेर आता त्यांचा घटस्फोट झाला.