खाजगी लष्कर, बोईंग, जेट आणि ३०० लक्झरी कार..., कोण आहे मलेशियाचा नवा राजा सुलतान इब्राहिम इस्कंदर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 13:15 IST2024-02-01T13:14:18+5:302024-02-01T13:15:49+5:30
जोहोर राज्याचा १७वा राजा म्हणून इब्राहिम इस्कंदर यांनी शपथ घेतली आहे.

खाजगी लष्कर, बोईंग, जेट आणि ३०० लक्झरी कार..., कोण आहे मलेशियाचा नवा राजा सुलतान इब्राहिम इस्कंदर?
Ibrahim Iskandar : सुलतान इब्राहिम इस्कंदर यांची मलेशियाचा नवीन राजा म्हणून निवड करण्यात आली. इब्राहिम इस्कंदर हे मलेशियातील जोहोर राज्याचा सुलतान आहे. या देशात नऊ वंशीय मलय राज्य शासक आहेत, ज्यांना फिरत्या आधारावर पाच वर्षे राजाची भूमिका स्वीकारण्याची जबाबदारी दिली जाते.
जोहोर राज्याचा १७वा राजा म्हणून इब्राहिम इस्कंदर यांनी शपथ घेतली आहे. मलेशियाची संघीय राजधानी क्वालालंपूर येथील नॅशनल पॅलेसमध्ये इब्राहिम इस्कंदर शपथ घेतली. दरम्यान, सुलतान इब्राहिम इस्कंदर यांच्या मालमत्तेची बरीच चर्चा आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, राजा यांची संपत्ती ५.७ अब्ज डॉलर आहे.
सुलतान इब्राहिम इस्कंदरच्या संपत्तीमध्ये रिअल इस्टेट, खाणकाम ते दूरसंचार आणि पाम तेल यासारख्या अनेक उद्योगांचा समावेश आहे. त्यांच्याकडे ३०० पेक्षा जास्त आलिशान गाड्या आहेत, ज्यामध्ये त्यांना कथितरित्या ॲडॉल्फ हिटलरने भेटवस्तू दिलेल्या एका कारचा समावेश आहे. तसेच, त्यांच्याकडे निळ्या रंगाचे बोईंग ७३७ सह खाजगी जेट देखील आहे. याशिवाय, या राजघराण्याकडे खाजगी लष्कर देखील आहे.
जोहोरमधील कोट्यवधी डॉलरच्या फॉरेस्ट सिटी डेव्हलपमेंट प्रकल्पातही इब्राहिम इस्कंदर यांचा मोठा वाटा आहे. सिंगापूरसोबत हाय-स्पीड रेल्वे लिंक प्रकल्पात त्यांचा सहभाग आहे. याशिवाय, यू मोबाईलची २४ टक्के भागीदारी आहे. तसेच, त्यांच्याकडे सिंगापूरमध्ये ४ अब्ज डॉलर किमतीची जमीन आहे, त्यांच्या पत्नीचे नाव जरीथ सोफिया आहे. ती देखील राजघराण्यातील आहे. ती ऑक्सफर्डची पदवीधर आणि लेखिका आहे.
मलेशियाचे राजे काय करतात?
मुस्लिम बहुल देशात राजा इस्लामचा संरक्षक म्हणून काम करतो. संघराज्य घटनेनुसार राजाने काही अपवाद वगळता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करणे आवश्यक आहे. राजाला पंतप्रधान नियुक्त करण्याची परवानगी आहे.