मुलाखतीशिवाय अमेरिकेचा व्हिसा रिन्यू करता येतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 01:20 PM2019-08-31T13:20:51+5:302019-08-31T13:21:49+5:30
1 सप्टेंबर 2019 पासून अमेरिकेने भारतीयांच्या व्हिसा रिन्यू करण्याच्या पद्धतीत बदल केला आहे.
प्रश्न- माझ्या अमेरिकेच्या व्हिसाची मुदत लवकरच संपणार आहे. माझ्या मित्राने गेल्या वर्षी त्याच्या व्हिसाचं मुलाखतीशिवाय नूतनीकरण (रिन्यू) केलं. मुलाखतीशिवाय व्हिसा रिन्यू करण्यासाठी नवी प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचं मी ऐकलंय. हे खरं आहे का? तुम्ही ती प्रक्रिया सांगू शकता का?
उत्तर- होय. 1 सप्टेंबर 2019 पासून अमेरिकेने भारतीयांच्या व्हिसा रिन्यू करण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. हा बदल मुलाखती संदर्भात आहे. पण व्हिसा रिन्यू करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता तीच आहे. मुलाखतीशिवाय व्हिसा रिन्यू करण्यास पात्र ठरल्यास तुम्ही तुमचा पासपोर्ट, व्हिसासाठी गरजेची कागदपत्रं जमा करण्यासाठी देशातील अकरा व्हिसा अर्ज केंद्रांपैकी (व्हीएसी-व्हिसा ऍप्लिकेशन सेंटर) एकाची निवड करून अपॉइंटमेंट घ्यावी. व्हिसा रिन्यू करण्यासाठी लागणारा वेळ कमी व्हावा, यासाठी हा बदल करण्यात आला आहे. B1/B2, C1/D, H1B, L आणि F अशा सर्व प्रकारच्या व्हिसासाठी हा बदल लागू आहे.
मुलाखतीशिवाय व्हिसा रिन्यू करण्यासाठी तुम्ही पात्र आहात का, हे प्रथम तपासून पाहा. त्यासाठीचे निकष तुम्ही www.ustraveldocs.com/in/niv-visarenew.asp#qualifications वर पाहू शकता.
तुम्ही यासाठी पात्र ठरत असल्यास अर्जाचं शुल्क भरून व्हिएसीची निवड करा आणि ड्रॉप ऑफ अपॉइंटमेंटची वेळ निश्चित करा. मुंबईतील अमेरिकेच्या दूतावासाच्या माध्यमातून अर्ज करणाऱ्या व्यक्ती मुंबई, पुणे किंवा अहमदाबादपैकी एका व्हीएसीची निवड करू शकतात.
ड्रॉप ऑफ अपॉइंटमेंटवेळी तुम्ही (किंवा तुमच्या वतीनं इतर कोणी) तुमचा वैध पासपोर्ट, तुमचा सध्याचा किंवा सर्वात अलीकडचा व्हिसा, सबमिशन फॉर्म (ऑनलाइन उपलब्ध आहे), गेल्या सहा महिन्यात काढलेला फोटो आणि अर्ज करत असलेल्या व्हिसासाठी आवश्यक असणारी इतर कागदपत्रं जमा करावीत. व्हीएसीचा कर्मचारी तुम्ही आवश्यक असलेली सर्व कागदपत्रं दिली आहेत का, हे तपासून बघेल.
काहीवेळा दूतावासातील अधिकारी तुमचा अर्ज पाहून तुम्हाला मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची विनंती करू शकतो. त्यावेळी तुम्हाला मुलाखतीसाठी तुम्ही निवडलेल्या दूतावासात यावं लागेल. त्यामुळे अर्ज करताना तुमच्या जवळच्या दूतावासाची निवड करा. कारण अर्ज करताना तुम्ही निवडलेला दूतावास नंतर बदलता येऊ शकणार नाही.
या नव्या प्रक्रियेमुळे व्हिसा लवकर रिन्यू होतो. अर्जदारांनी ड्रॉप ऑफ अपॉइंटमेंटची तारीख निश्चित केल्यानंतरच्या 7 ते 10 दिवसांमध्ये त्यांना याबद्दलचा निर्णय कळवण्यात येतो.
या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळाला भेट द्या.