किम जोंग उनच्या प्रकृतीबाबत अजूनही अस्पष्टता; उत्तर कोरियात हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 10:39 AM2020-05-01T10:39:09+5:302020-05-01T10:58:30+5:30
दक्षिण कोरियातील जुन्गअंब लबोनं या वृत्तपत्रामध्ये किम जोंग उन यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे ते बाहेर येत नाही, असा दावा केला होता.
उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्यावर कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली असल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. तसेच किम जोंग उन कोमात गेले असल्याचा दावा ब्रिटनच्या Dailymail या वृत्तपत्राने केला होता. त्याचप्रमाणे किम जोंग उन यांच्या मृत्यू झाला असल्याचा दावा देखील आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला होता. मात्र किम जोंग उन यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत दक्षिण कोरियाने या वृत्ताचे पुन्हा एकदा खंडन केले आहे. दक्षिण कोरियाने प्रकृतीच्या वृत्तांचे खंडन केले असले तरी उत्तर कोरियात नवा उत्तराधिकारी निवडण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
तइवानच्या गुप्तचर विभागाने दावा केला आहे की, किम जोंग उन यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे किम जोंग उनच्या जागी नवा उत्तराधिकारी निवडण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच किम जोंग उन यांनी विविध निर्णय घेण्याचे बंद केले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
उत्तर कोरियाचा नवा उत्तराधिकारी कोण होणार याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र किम जोंग उनची उत्तराधिकारी म्हणून त्याची बहीण किम यो जोंग हिचे नाव आघाडीवर आहे. किम यो जोंग हिचा निर्णय घेणाऱ्या प्रमुख समितीत पुन्हा समावेश करण्यात आल्यानंतरच किम जोंग उनची प्रकृती बिघडल्याने संकेत मिळू लागले होते.
तत्पूर्वी, दक्षिण कोरियातील जुन्गअंब लबोनं या वृत्तपत्रामध्ये किम जोंग उन यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे ते बाहेर येत नाही, असा दावा केला होता. तसेच डॉनंग- ए- लंबोनं या वृत्तपत्रानं देखील किम जोंग उन यांच्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे किम जोंग उन यांनी उत्तर कोरियामध्ये 'रिसॉर्ट' परिसरात थांबण्याचा निर्णय घेतला, असं सांगण्यात आले होते.
किम जोंग उन यांच्या मालकीची असलेली खास ट्रेन उत्तर कोरियामध्ये 'रिसॉर्ट' परिसरात असल्याचे सांगण्यात येत होते. वॉशिंग्टनमधील उत्तर कोरियाच्या मॉनिटरींग प्रकल्पाद्वारे सॅटेलाइटच्या फोटोनूसार, किम जोंग उन यांची ट्रेन उत्तर कोरियामधील रिसॉर्ट परिसरात उभी असल्याचे दिसून आले होते. यावर किम जोंग उन 13 एप्रिलपासून देशाच्या पूर्वेकडील रिसॉर्ट शहर असलेल्या वॉनसन येथे राहात असल्याचे देखील दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या वरिष्ठ सल्लागारांनी सांगितले आहे.