संयुक्त राष्ट्रांचे पुढील महासचिव निवडण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 03:03 AM2021-01-17T03:03:50+5:302021-01-17T07:11:37+5:30
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव व पोर्तुगालचे माजी पंतप्रधान गुतारेस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ३१ रोजी संपत आहे. त्यांनी वोजकीर व लादेब यांना पत्र लिहून आपण दुसऱ्या कार्यकाळासाठी तयार आहोत, असे म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्र महासभा व सुरक्षा परिषदेच्या जागतिक संघटनेचा पुढील प्रमुख निवडण्याच्या दिशेने या महिन्याच्या अखेरीस पहिले पाऊल पडण्याची शक्यता आहे. महासभेचे अध्यक्ष बोल्कान बोजकीर यांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांतील ट्युनिशियाचे राजदूत व सुरक्षा परिषदेचे विद्यमान प्रमुख तारिक लादेब ३१ जानेवारीपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्य देशांना पत्र पाठवून विद्यमान महासचिव अँटोनियो गुतारेस यांच्या विरोधात उमेदवार उतरविण्याबाबत सांगू शकतात.
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव व पोर्तुगालचे माजी पंतप्रधान गुतारेस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ३१ रोजी संपत आहे. त्यांनी वोजकीर व लादेब यांना पत्र लिहून आपण दुसऱ्या कार्यकाळासाठी तयार आहोत, असे म्हटले आहे. महासभा १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेच्या सल्ल्याने महासचिवांची निवड करते. सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांकडे नकाराधिकार आहे. त्यामुळे त्यांचे समर्थन अत्यंत महत्त्वाचे ठरते. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यापूर्वीच गुतारेस यांना पाठिंबा दिलेला आहे; परंतु अन्य नकाराधिकार प्राप्त देश अमेरिका, रशिया, चीन व फ्रान्सने अद्याप आपला दृष्टिकोन स्पष्ट केलेला नाही.
या सगळ्या परिस्थितीच्या पाश्वभूमीवर याबाबत नेमके काय घडेल, हे आताच सांगता येणार नाही.