‘गांधी’ चित्रपटाचे निर्माते रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचे निधन

By admin | Published: August 25, 2014 11:48 PM2014-08-25T23:48:08+5:302014-08-25T23:48:08+5:30

महात्मा गांधी यांचे जीवन पडद्यावर आणण्यासाठी तब्बल २० वर्षे परिश्रम घेणारे आॅस्कर विजेते ब्रिटिश चित्रपट निर्माते रिचर्ड अ‍ॅटनबरो (९०) यांचे निधन झाले.

Producer Richard Attenborough's death of 'Gandhi' | ‘गांधी’ चित्रपटाचे निर्माते रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचे निधन

‘गांधी’ चित्रपटाचे निर्माते रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचे निधन

Next

लंडन : महात्मा गांधी यांचे जीवन पडद्यावर आणण्यासाठी तब्बल २० वर्षे परिश्रम घेणारे आॅस्कर विजेते ब्रिटिश चित्रपट निर्माते रिचर्ड अ‍ॅटनबरो (९०) यांचे निधन झाले. त्यांचा बापूजींच्या जीवनावरील ‘गांधी’ हा चित्रपट १९८२ मध्ये प्रदर्शित झाला होता.
अलीकडे अ‍ॅटेनबरो यांची प्रकृती बरी नव्हती. रविवारी दुपारच्या जेवणावेळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला, असे त्यांचे चिरंजीव मायकल अ‍ॅटनबरो यांनी सांगितले. चार दिवसांनी ते ९१ वा वाढदिवस साजरा करणार होते.
‘गांधी’ चित्रपटासाठी अ‍ॅटनबरो यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा अकादमी पुरस्कार (आॅस्कर अवॉर्ड) मिळाला होता. त्यावर्षीच्या आॅस्कर सोहळ्यात ‘गांधी’ने धूम केली होती. या चित्रपटाने आठ आॅस्कर पटकावले होते. त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व सर्वोत्कृष्ट अभिनेता आदी पुरस्कारांचा समावेश होता. ‘गांधी’ चित्रपटामुळे अ‍ॅटनबरो यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात बेन किंग्सले यांनी महात्मा गांधी यांची भूमिका केली होती. या चित्रपटाला समीक्षकांनी गौरविले, तसेच प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतले होते.
अ‍ॅटनबरो यांना श्रद्धांजली अर्पण करताना ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून म्हणाले की, ‘ब्राइटन रॉक’ चित्रपटात त्यांनी दमदार अभिनय केला होता. ‘गांधी’ चित्रपटाचे त्यांनी केलेले दिग्दर्शन सर्वांगसुंदर होते. अ‍ॅटेनबरो हे चित्रपट क्षेत्रातील महनीय व्यक्तींपैकी एक होते. अ‍ॅटनबरो यांना डिकी या टोपणनावानेही ओळखले जाई. अ‍ॅटनबरो यांच्या स्मृती जागविताना किंग्सले म्हणाले, गांधीजींची भूमिका मी चांगल्या प्रकारे वठवील, असा विश्वास त्यांना होता. गांधी चित्रपटाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना २० वर्षे लागली. त्यांनी मला गांधीजींची भूमिका देऊ केली तेव्हा मला खूप आनंद झाला, असेही ते म्हणाले. कुटुंबासह मित्र, देश आणि करिअरशी त्यांचा खूप जिव्हाळा होता. त्यांनी ‘गांधी’ चित्रपटाद्वारे जगाला अनमोल भेट दिली आहे, असे स्पीलबर्ग म्हणाले. वयाच्या १२ व्या वर्षीच त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. १८ वर्षांचे असताना त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आले होते. १९४२ मध्ये त्यांचा पहिला चित्रपट ‘इन व्हीच वुई सर्व’ पडद्यावर झळकला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Producer Richard Attenborough's death of 'Gandhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.