Prophet Row : ’तो’ आमच्यासाठी मोठा मुद्दा नाही, भारताचा अंतर्गत प्रश्न - बांगलादेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 07:54 PM2022-06-13T19:54:45+5:302022-06-13T19:55:19+5:30
बांगलादेश सरकार या मुद्द्यावर तडजोड करत असल्याची टीकाही त्यांनी फेटाळून लावली. ढाका येथेही काही संघटनांनी १० जून रोजी या मुद्द्यावर निदर्शने केली होती.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेली टिप्पणी ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे बांगलादेशच्या वरिष्ठ मंत्र्यांनी म्हटले आहे. सौदी अरेबिया, इराणसह अनेक देशांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत भारत सरकारकडे कारवाईची मागणी केली होती. तर अशा परिस्थितीत दुसरीकडे बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री हसन महमूद यांनी ही टिप्पणी केली आहे. हा बांगलादेशसाठी कोणता मोठा मुद्दा नाही. यासोबतच बांगलादेश सरकार या मुद्द्यावर तडजोड करत असल्याची टीकाही त्यांनी फेटाळून लावली. ढाका येथेही काही संघटनांनी १० जून रोजी या मुद्द्यावर निदर्शने केली होती.
“भारत सरकारने या मुद्द्यावर केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेले कोणतेही वक्तव्य निषेधार्ह आहे. या प्रकरणी भारतात एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि त्या आधारावर कठोर कारवाई केली जाईल अशी आशा आहे,” असेही हसन महमूद म्हणाले. बांगलादेश सरकार पैगंबर मोहम्मद यांच्यावर करण्यात आलेल्या टिपण्णीवर कोणतीही तडजोड करत नाही आणि करणारही नाही. मी स्वतः याचा निषेध केला आहे आणि जाहीर सभेतही याबद्दल बोललो आहे, असं त्यांनी बांगलादेश सरकारकडून हलगर्जीपणा दाखवल्याच्या करण्यात आलेल्या आरोपांवर बोलताना स्पष्टीकरण दिलं.
दरम्यान, बांगलादेशनं सार्वजनिकरित्या निवेदन जारी न केल्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावरही बांगलादेशकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “हे बांगलादेशचं अंतर्गत प्रकरण नाही. बाहेरील प्रकरण आहे. जेव्हा केव्हा जगात असं काही घडतं तेव्हा काही इस्लामिक पक्ष या ठिकाणीही आंदोलन करतात. असं सातत्यानं होत असतं. जितका अरब देश, पाकिस्तान, मलेशियात होतो तितका हा मोठा मुद्दा या ठिकाणी नाही,” असंही महमूद यांनी स्पष्ट केलं. जर पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात जगात कुठेही काहीही झालं तर त्याचा निषेध केला गेलाच पाहिजे. भारत सरकारनं केलेल्या कारवाईचं आम्ही स्वागत करत असल्याचंही ते म्हणाले.