युद्धबंदीचा प्रस्ताव पॅलेस्टीनला मान्य
By admin | Published: August 11, 2014 01:24 AM2014-08-11T01:24:44+5:302014-08-11T01:24:44+5:30
इस्रायलसोबत ७२ तासांच्या युद्धबंदीशी संबंधित नवा प्रस्ताव आपण स्वीकारला असल्याचे पॅलेस्टीनने म्हटले आहे. गाझा संकट संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना इजिप्तने हा प्रस्ताव दिला होता.
गाझा : इस्रायलसोबत ७२ तासांच्या युद्धबंदीशी संबंधित नवा प्रस्ताव आपण स्वीकारला असल्याचे पॅलेस्टीनने म्हटले आहे. गाझा संकट संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना इजिप्तने हा प्रस्ताव दिला होता.
आम्ही तडजोड घडवून आणण्याच्या प्रयत्नांत आहोत. चर्चेशिवाय तडजोड होऊ शकत नाही. चर्चा सुरू व्हावी यासाठी आम्ही ७२ तासांच्या नव्या युद्धबंदीशी संबंधित प्रस्ताव स्वीकारला आहे, असे एका पॅलेस्टिनी अधिकाऱ्याने सांगितले. अल अरबिया वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अन्य एका इस्रायली अधिकाऱ्यानेही युद्धबंदीस दुजोरा दिला आहे; मात्र इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने युद्धबंदी कधीपासून अमलात येईल हे स्पष्ट होऊ शकले नाही. तत्पूर्वी दोन्ही पक्षांनी एकमेकांना इशारे दिले होते.
इस्रायल कोणत्याही पूर्वअटीशिवाय चर्चेत सहभागी न झाल्यास आपण चर्चेतून बाहेर पडू, असा इशारा पॅलेस्टाईनच्या संवादकांनी दिला. पॅलेस्टिनींनी रॉकेट हल्ले सुरूच ठेवले तर आपण चर्चेत भाग घेणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले असले तरी इस्रायलचे संवादक कैरोला रवाना झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, इस्रायलचे हल्ले सुरूच असून पॅलेस्टीन भागातूनही रॉकेट हल्ले झाल्याचे वृत्त आहे.
(वृत्तसंस्था)