गायींच्या रक्षणासाठी बीएसएफ मैदानात , बांगलादेशी उद्योग गोत्यात
By admin | Published: July 3, 2015 03:57 PM2015-07-03T15:57:59+5:302015-07-03T15:58:43+5:30
भारतीय सीमा रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सीमा सुरक्षा दलाकडे आता गायींच्या रक्षणाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - भारतीय सीमा रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सीमा सुरक्षा दलाकडे आता गायींच्या रक्षणाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. बांगलादेश व अन्य मुस्लिमबहुल राष्ट्रांमध्ये होणारी गायींची तस्करी रोखण्याचे काम या जवानांकडे सोपवण्यात आले असून जवानांच्या धडक मोहीमेंमुळे बांगलादेशमधील गोमांस व चर्मोद्योगाला कोट्यावधींचा फटका बसला आहे.
भारतातून बांगलादेशमध्ये प्रतिवर्षी लाखो गायींची तस्करी होते व यातील आर्थिक उलाढाल तब्बल ३०० हून अधिक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. भारतात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून काही राज्यांमध्ये गोहत्या बंदीचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. तर गायींच्या रक्षणासाठी केंद्र सरकारनेही पावले उचलली आहेत. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बांगलादेश दौरा केला होता व दौ-यानंतर त्यांनी भारताच्या बीएसएफच्या जवानांना गायींची तस्करी रोखण्याचे आदेश दिले होते. 'दररोज रात्री बीएसएफचे जवान हातात काठी व दोरी घेऊन ताग व भाताच्या शेतीतून तस्करांचा पाठलाग करतात व गायींची सुटका करतात. काही वेळेला तस्करांना पकडण्यासाठी पोहत पाठलाग करावा लागतो' अशी माहिती सूत्रांनी दिली. भारतीय जवानांनी आत्तापर्यंत ९० हजार गायींची सुटका केली असून तब्बल ४०० भारतीय व बांगलादेशी तस्करांना अटक करण्यात आली आहे.
मोदी सरकारला गायींची तस्करी पूर्णतः बंद करायची आहे. पण त्याचा फटका शेजारी राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवर बसू लागला आहे. नेपाळ, म्यानमार, भूटान या देशांमधूनही बांगलादेशमध्ये गायी आणल्या जातात, पण त्यांचा दर्जा भारतातील गायींसारखा नसते, त्यामुळेच भारतातून आलेल्या गायींना बांगलादेशमध्ये जास्त मागणी आहे असे स्थानिक व्यापा-यांचे म्हणणे आहे. बांगलादेशमधून दरवर्षी सुमारे १२५ टन गोमांस आखाती देशांमध्ये पाठवले जाते. मात्र भारताच्या कडक धोरणामुळे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी ७० टक्क्यांनी घटली आहे अशी माहिती सय्यद हसन हबीब यांनी दिली. हबीब हे बांगलादेशमध्ये मांस निर्यातीचा व्यवसाय करतात. भारताच्या धोरणामुळे गायींच्या दरात ४० टक्क्यांनी वाढली असून काही ठिकाणी कत्तलखाने बंद होण्याची नामूष्की ओढावली आहे. बांगलादेशमधील चर्मोद्योगाचे १९० कारखाने बंद पडले असून सुमारे चार हजार कामगार बेरोजगार आहेत.
बांगलादेशला या मोहीमेचा फटका बसत असला तरी बीएसएफकडे गायींची तस्करी रोखण्याचे काम देण्यावर काही जण नाराजी व्यक्त करतात. आम्ही दररोज रात्री गायींचा पाठलाग का करतो हेच आम्हाला समजत नाही अशी प्रतिक्रिया एका जवानाने दिली.