आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात मोठा वाद! विद्यार्थी रस्त्यावर; सहा जणांचा मृत्यू, शाळा-कॉलेज बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 11:50 AM2024-07-18T11:50:39+5:302024-07-18T11:52:30+5:30
protest against reservation in bangladesh : यावर बोलताना शेख हसिना म्हणाल्या, यासंदर्भातील सर्व निर्णय आपल्या हातात आहे. बांगलादेशात ३०% नोकऱ्या युद्ध वीरांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशातही वाद पेटला आहे. या वादात आतापर्यंत किमान 6 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून आरक्षण संपवण्याची मागणी करत आहेत. या आंदोलनाने आता हिंसक रूप घेतले आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 400 हून अधिक जखमी झाल्याचे समजते. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, बुधवार सायंकाळी या आंदोलनाला सुरुवात झाली.
दरम्यान, विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत एका मुलासह 6 जणांना गोळी लागली आहे. सुरक्षा दलांच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून विद्यार्थ्यांनी गुरुवारी देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. आंदोलन प्रमुख आसिफ महमूदने म्हटले आहे की, रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा वगळता सर्व बंद राहील. याशिवाय, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसाचारात मृत्यू झालेल्यांबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयीन चौकशी समिती स्थापन केली जाईल, असेही म्हटले आहे.
का भडकलं आंदोलन? -
बांगलादेशात 1971 च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये दिले जाणारे आरक्षण रद्द करण्यासाठी हे आंदोलन होत आहे. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने आठवड्याभरापूर्वी या आरक्षणावर बंदी घातली होती. मात्र, पंतप्रधान शेख हसीना यांनी त्याची अंमलबजावणी होऊ दिली नाही. यामुळे विद्यार्थ्यी रस्त्यावर उतरले आहेत. यावर बोलताना शेख हसिना म्हणाल्या, यासंदर्भातील सर्व निर्णय आपल्या हातात आहे. बांगलादेशात ३०% नोकऱ्या युद्ध वीरांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामुळेच विद्यार्थी भडकले आहेत. कारण मेरिटच्या आधारावर नोकऱ्या मिळाव्यात अशी मागणी विदयार्थ्यांकडून केली जात आहे.
विद्यार्थ्यांना चिथावण्यात आले आहे -
याचवेळी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, या विद्यार्थ्यांना चिथावण्यात आले आहे. यासाठी त्यांनी काही स्वार्थी घटकांना जबाबदार धरले आहे. तसेच उपद्रवी मंडळी या स्थितीचा फायदा घेतील, अशी कोणतीही कृती विद्यार्थ्यांनी करू नये. असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.