तालिबानचा विरोध वाढला; लोक रस्त्यावर, काबुलसह अनेक शहरांत निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 12:54 AM2021-08-20T00:54:59+5:302021-08-20T01:08:12+5:30
Protest against taliban rule in Afghanistan : अफगाणिस्तान 19 ऑगस्ट 1919 रोजीच ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला होते. मात्र यावेळी, स्वातंत्र्यदिन साजरा होण्यापूर्वीच तेथे तालिबानने कब्जा केला. स्वातंत्र्य दिनानिमित्त अफगाणिस्तानातील आंदोलक लोक काबुलमध्ये 'हमारा झंडा, हमारी पहचान' अशी घोषणा देत होते.
काबुल - अफगाणिस्तानवरतालिबानने कब्जा केल्यानंतर लोक सुरुवातीला भयभीत झाले होते. मात्र, आता हेच लोक तालिबानचा निषेध करत रस्त्यावर उतरले आहेत. हे लोक अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह अनेक शहरांमध्ये तालिबान विरोधात निदर्शने करत आहेत. या लोकांना समजावण्यासाठी तालिबान देशातील इमामांचीही मदत घेत आहे. शुक्रवारच्या नमाजच्या वेळी सर्व लोकांना एकत्रित रहायला सांगण्यात यावे, असे त्यांना सांगण्यात आले आहे. (Protest against taliban rule in Afghanistan's kabul and asadabad)
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानी दहशतवाद्यांनी गुरुवारी कुनार प्रांतातील असदाबाद येथे आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात काही लोकांचा मृत्यू झाल्याचे, तेथील उपस्थित लोक सांगतात. मात्र, गोळीबारात जीव गेला, की चेंगराचेंगरीमुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याच बरोबर, काबूलमध्येही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. तेथे तालिबानी दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात येते.
स्वातंत्र्यदिनीच अफगाणिस्तानातील नागरिकांनी केला तालिबानचा विरोध -
अफगाणिस्तान 19 ऑगस्ट 1919 रोजीच ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला होते. मात्र यावेळी, स्वातंत्र्यदिन साजरा होण्यापूर्वीच तेथे तालिबानने कब्जा केला. स्वातंत्र्य दिनानिमित्त अफगाणिस्तानातील आंदोलक लोक काबुलमध्ये 'हमारा झंडा, हमारी पहचान' अशी घोषणा देत होते. या लोकांच्या हातात अफगाणिस्तानचा झेंडा होता. तसेच पुरुष आणि महिलांनी हाताला काळी पट्टी बांधलेली होती. एवढेच नाही, तर आंदोलकांनी काही ठिकाणी तालिबानचा पांढरा झेंडाही फाडला.