मुस्लिमांबाबतच्या ट्रम्प यांच्या धोरणाचा निषेध
By admin | Published: May 17, 2016 04:49 AM2016-05-17T04:49:57+5:302016-05-17T04:49:57+5:30
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुस्लिमांबाबतच्या धोरणांवर अध्यक्ष बराक ओबामा यांनी टीका केली
वॉशिंग्टन : अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुस्लिमांबाबतच्या धोरणांवर अध्यक्ष बराक ओबामा यांनी टीका केली आहे. अमेरिका आणि अन्य देशात भिंती उभारण्याच्या योजनेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे कट्टरपंथीयांविरुद्धच्या लढाईत अमेरिकेचे प्रमुख सहकारी दुरावले जातील, अशी भीतीही ओबामा यांनी व्यक्त केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचे वक्तव्य यापूर्वीच केलेले आहे. रुटगर्स विद्यापीठात दीक्षान्त समारंभात ओबामा यांनी ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. अमेरिका आणि मेक्सिको सीमेवर भिंत बनविण्याच्या ट्रम्प यांच्या प्रस्तावावर ओबामा म्हणाले की, जग पूर्वीपेक्षा जास्त जवळ येत आहे. आंतरराष्ट्रीय संबंध वाढत आहेत. भिंती उभ्या करून ही परिस्थिती बदलता येणार नाही.
जेव्हा एखाद्या देशाची एकूणच परिस्थिती बिघडते, तेव्हा तो देश अतिरेक्यांसाठी आश्रय बनतो. जेव्हा विकसनशील देशांकडे पुरेशा आरोग्य सुविधा नसतात, तेव्हा झिका आणि इबोला यासारखे रोग पसरत जातात. हे रोग अमेरिकेलासुद्धा संकटात टाकू शकतात. कोणतीही भिंत याला रोखू शकत नाही. मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यात येईल या विचारांनाच ओबामा यांनी आव्हान दिले. ते म्हणाले की, मुस्लिमांबाबतची ही विचारधारा म्हणजे आमच्या मूूल्यांशी हा विश्वासघात ठरेल. आमच्या अस्तित्वाशी विश्वासघात ठरेल.