श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनात आंदोलकांचा धुमाकूळ, स्विमिंग पूलमध्ये मस्ती, बेडरूममध्ये उड्या आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 06:01 PM2022-07-09T18:01:58+5:302022-07-09T18:03:31+5:30
Sri Lanka Crisis: श्रीलंकेत सरकारविरोधातील आंदोलन अधिकच तीव्र झालं आहेत. त्यातच आज हजारो आंदोलकांनी थेट राष्ट्रपती भवनाकडे कूच करत त्यावर कब्जा केला. यादरम्यान, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे राष्ट्रपती भवन सोडून पसार झाले.
कोलंबो - आर्थिक संकटामुळे अडचणीत आलेल्या श्रीलंकेमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालली आहे. सरकारविरोधातील आंदोलन अधिकच तीव्र झालं आहेत. त्यातच आज हजारो आंदोलकांनी थेट राष्ट्रपती भवनाकडे कूच करत त्यावर कब्जा केला. यादरम्यान, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे राष्ट्रपती भवन सोडून पसार झाले.
दरम्यान, आंदोलकांपैकी काही जणांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केल्यानंतर तिथे धुडगूस घातला. तसेच मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. काही जणांनी राष्ट्रपती भवनातील स्विमिंग पूलमध्ये येऊन मनसोक्त उड्या मारल्या. हा संपूर्ण प्रकार व्हिडीओमध्ये चित्रीत झाला असून, त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये अनेक आंदोलक राष्ट्रपती भवनाच्या आवारात दिसत असून चहुबाजींनी अंदाधुंदी असल्याचे दिसत आहे.
तर काही आंदोलक राष्ट्रपती भवनातील बेडरूममध्ये घुसलेले दिसत आहेत. तिथे ते उड्या मारताना तसेच सामानाची मोडतोड केली. पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. मात्र आंदोलक मागे फिरले नाही. त्यांनी मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली.
Protesters inside President's house pic.twitter.com/lN7x58XL6Q
— NewsWire 🇱🇰 (@NewsWireLK) July 9, 2022
यादरम्यान, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी श्रीलंकेचे पंतप्रदान रानिल विक्रमसिंघे यांनी आपातकालीन बैठक बोलावली आहे. तसेच त्यांनी संसदेचं अधिवेशन बोलावण्याचे आवाहनही केलं आहे. तर १६ खासदारांनी पत्र लिहून राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Video footage of Sri Lankan protesters taking over President's office in Colombo
— NewsWire 🇱🇰 (@NewsWireLK) July 9, 2022
📸 Buddi U Chandrasiri pic.twitter.com/FINwaaqUat
दरम्यान, गॉल शहरात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. तिथेही आंदोलक पोहोचले होते. आज सकाळपासून हजारो आंदोलक गॉल येथे पोहोचले असून, त्यांनी स्टेडियमच्या बाहेर आणि स्टेडियममध्ये आपला आवाज बुलंद केला. मात्र या आंदोलनाचा सामन्यावर काही परिणाम झाला नाही. आंदोलन सुरू असताना कसोटी सामना नियोजितपणे सुरू राहिला.