कृष्णवर्णीयांवरील अन्यायामुळेच अमेरिकेत निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 05:01 AM2020-06-01T05:01:21+5:302020-06-01T05:01:36+5:30
जॉर्ज फ्लॉईडचे मृत्यू प्रकरण निमित्त
वॉशिंग्टन : अमेरिकेतील मिनियापोलीस येथे जॉर्ज फ्लॉईड (४७ वर्षे) या कृष्णवर्णीय नागरिकाची एका पोलीस अधिकाऱ्याने हत्या केल्याचा आरोप आहे. जॉर्जच्या मृत्यूच्या निषेधार्थ अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये उग्र निदर्शने सुरू आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे १५०० निदर्शकांना अटक केली आहे. अमेरिकेत कृष्णवर्णीय नागरिकांवर होणाºया अत्याचारांची नीट दाद लागत नसल्यामुळे त्याबद्दलचा असंतोष जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूच्या निमित्ताने संपूर्ण अमेरिकाभर निदर्शनांच्या रूपाने उफाळून आला आहे.
जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूच्या निषेधार्थ निदर्शने करणाऱ्यांना पांगविण्यासाठी बळाचा वापर केला जाईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दिला. निदर्शने करणारे गुंड असल्याचे विधानही त्यांनी केले होते. एखादी कृती निदर्शनांपर्यंत मर्यादित राहिली तर ते समजून घेता येईल; पण निदर्शनांच्या नावाखाली लुटालूट केली जात असेल तर त्यांच्यावर वेळप्रसंगी गोळीबार करण्यात येईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
बनावट नोट चालविण्याचा प्रयत्न
जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाने २० डॉलरची एक बनावट नोट एका दुकानात चालविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. जॉर्जला त्याच्या कारमधून उतरायला सांगितल्यानंतर त्याने पोलिसांशी हुज्जत घातली व झटापटही केली, असे पोलिसांनी सांगितले. त्यावेळी रस्त्यावरून जाणाºयांपैकी कोणीतरी या घटनेचे मोबाईल फोनमधून चित्रीकरण केले.