हाँगकाँगमध्ये परस्परविरोधी रॅलींनी वातावरण ढवळून निघाले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 05:01 AM2019-08-18T05:01:58+5:302019-08-18T05:05:02+5:30
लोकशाहीवादी कार्यकर्ते पुन्हा एकदा हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचे नियोजन करीत आहेत. या स्थितीत आंदोलन झाल्यास विमानतळाचे कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान असेल.
हाँगकाँग : लोकशाहीवादी कार्यकर्ते पुन्हा एकदा हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचे नियोजन करीत आहेत. या स्थितीत आंदोलन झाल्यास विमानतळाचे कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान असेल. तसेच चीनचे पुढचे पाऊल कोणते असेल, याकडेही साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
विरोधक जोरदार आंदोलनाची तयारी करीत असतानाच हजारो सरकार समर्थक आंदोलक शनिवारी एका पार्कमध्ये जमा झाले व त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. सरकार समर्थकांकडे चीनचे अनेक ध्वज होते. शनिवारच्या रॅलीची सुरुवात पावसाने झाली तरी हजारो लोकांनी यात सहभाग नोंदविला. याचे नेतृत्व विशेष करून युवकांनी केले. दुपारी गर्दी हुंग होम क्वान वानच्या मार्चसाठी एकत्र होत होती.
पोलिसांनी सुरुवातीला रॅलीवर प्रतिबंध घातले होते. परंतु रॅलीचा मार्ग बदलल्याने विरोध मावळला. रविवारच्या रॅलीसाठी आंदोलनकर्त्यांना एका पार्कमध्ये जमा होण्याची परवानगी दिली आहे. परंतु रस्त्यांवर मार्च काढण्यावर बंदी घातली आहे.
बंदराजवळ बीजिंग समर्थक आंदोलकांनी रॅली काढली. तेथे भले मोठे टीव्ही स्क्रीन लावण्यात आले आहेत. त्यावर पोलिसांबरोबर नुकत्याच झालेल्या झटापटीची छायाचित्रे दाखविण्यात आली आहेत.
६० वर्षीय सेवानिवृत्त इरेने मान यांनी लोकशाहीवादी कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इरेने म्हणाले की, त्यांचे कृत्य अमानवीय आहे. ते सर्व दानवांसारखे वागत आहेत. ते दंगेखोर आहेत.