अखेर पाकिस्तानच्या सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने हिंदू समाजाची मागितली माफी, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 04:47 PM2021-02-25T16:47:21+5:302021-02-25T16:54:19+5:30
Aamir Liaquat Hussain And Hindu : पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ म्हणजेच पीटीआयच्या एका खासदाराला हिंदू समाजाची माफी मागावी लागली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ म्हणजेच पीटीआयच्या एका खासदाराला हिंदू समाजाची माफी मागावी लागली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाच्या आमिर लियाकत हुसैन (Aamir Liaquat Hussain) या खासदाराला त्याने केलेल्या एका वादग्रस्त टि्वटमुळे माफी मागावी लागली आहे. यासोबतच हिंदू (Hindu) समाजाचा अनादर करणारे टि्वटही डिलीट करावे लागले आहे. माजी पंतप्रधान (Pakistan) नवाझ शरीफ यांची कन्या मरीयम नवाज या विरोधी पक्षनेत्या आहेत. मरीयम यांची खिल्ली उडवण्यासाठी आमिर लियाकत हुसैन यांनी हिंदू देवतेचा फोटो टि्वट केला आणि यावरून नवा वाद निर्माण झाला.
आमिर लियाकत हुसैन यांच्या टि्वटचा पाकिस्तानात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजाने मोठया प्रमाणावर निषेध केला व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. आमिर लियाकत हुसैन तेहरीक-ए-इन्साफकडून राष्ट्रीय सभागृहाचे सदस्य आहेत. पाकिस्तानातील हिंदूंकडून झालेल्या निषेधानंतर आमिर हुसैन यांनी ते टि्वट डिलीट केलं व हिंदू समाजाची माफी मागितली. तसेच "हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याची मला कल्पना आहे. सर्व धर्मांवर माझा विश्वास आहे, हेच मला माझ्या धर्माने शिकवले आहे" असं आमिर हुसैन यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानातील हिंदू समाजाबरोबर तिथल्या राजकारण्यांनाही आमिर लियाकत हुसैन यांच्या टि्वटचा निषेध केला आहे. पाकिस्तान हिंदू परिषदेचेही प्रमुख रमेश कुमार वाकंवानी यांनी "धार्मिक स्कॉलर म्हणवणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारचे टि्वट करणे शोभत नाही. त्याच्या लज्जास्पद कृत्याचा आम्ही निषेध करतो" असं म्हटलं आहे. पाकिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते कपिल देव यांनी देखील ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत आमिर लियाकत हुसैन यांची निंदा केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.