PUBG गेमच्या सवयीने केलं घर उद्ध्वस्त, मुलाने आई, भाऊ-बहिणींवर झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 06:47 PM2022-02-01T18:47:01+5:302022-02-01T18:58:46+5:30
Pakistan : पोलिसांनी सांगितलं की, अली जैनने १८ जानेवारीला आपली आई, दोन बहिणी आणि एका भावावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
तरूणाईमध्ये PUBG गेमची किती क्रेझ आहे हे काही वेगळं सांगायला नको. यासंबंधी वेगवेगळ्या विचित्र घटना ऐकायला मिळतात. अशीच पब्जी गेमच्या (PUBG) सवयीबाबत पाकिस्तानातून (Pakistan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका टीनएजरला पब्जीची अशी सवय लागली की, गेमच्या दुनियेला तो आपलं जग समजू लागला. इतकंच नाही तर त्याने आईसहीत भाऊ-बहिणीवर गोळी झाडली. पाकिस्तान पोलिसांनी हे प्रकरण समोर आल्यानंतर देशात पब्जी गेमवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, अली जैनने १८ जानेवारीला आपली आई, दोन बहिणी आणि एका भावावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. जेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली तर त्याने दावा केला की, पब्जी गेमने त्याला हत्या करण्यासाठी भाग पाडलं होतं.
पोलीस अधिकारी इमरान किश्वरने सांगितलं की, 'अशाप्रकारची ही पहिलीच घटना नाहीये. याआधीही पब्जीला बॅन करण्याची मागणी करण्यात आली आहे'.
PUBG हा एक ऑनलाइन मल्टीप्लेअर 'बॅटल रॉयल' गेम आहे. ज्यात विजेताच शेवटी जिवंत व्यक्ती असतो. PUBG जगभरात सर्वाधिक लोकप्रिय गेम आहे. इमरान किश्वरने सांगितलं की, १८ वर्षीय अली आपल्या रूममध्ये पूर्णपणे वेगळा राहत होता आणि PUBG खेळण्याची त्याला सवय लागली होती.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने लाहोरच्या एका पोलिसांच्या हवाल्याने सांगितलं की, अलीने आपल्या परिवारावर हा विचार करत गोळ्या झाडल्या की, जसं गेममध्ये होतं मृत व्यक्ती परत येतात, तसा त्याचा परिवारही पुन्हा परत येईल.
पाकिस्तान दूरसंचार अधिकाऱ्यांनी आधीही PUBG चा अॅक्सेस काही काळासाठी बंद केला होता. गेममधील हिंसेबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. ज्यानंतर पब्जीवर काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती. दरम्यान भारत आणि चीनसारख्या देशांमध्येही पब्जी गेमवर बंदी आहे.