पाकिस्तानी सैन्यावर पुलवामा सारखा हल्ला; 9 सैनिक ठार, पोसलेले दहशतवादी उलटले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 01:39 PM2023-09-01T13:39:41+5:302023-09-01T13:40:05+5:30
भारताविरोधात दहशतवाद पोसणाऱ्या, अब्जावधी पैसे खर्च करणाऱ्या पाकिस्तानला आता दहशतवादाने पोखरले आहे. विकासाऐवजी भारताविरोधात पैसे उधळल्याने पाकिस्तान आता कंगाल देश बनला आहे.
दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये न सैनिकांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. खैबर पख्तूनख्वा प्रांतात हा पुलवामासारखा हल्ला झाला आहे.
एका दुचाकीस्वार आत्मघाती हल्लेखोराने सैन्याच्या ताफ्यावर स्फोटकांनी लादलेली दुचाकी आदळवली आहे. १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये असाच आत्मघाती हल्ला भारतीय जवानांवर झाला होता. सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली कार आदळवली होती. यामध्ये ४० जवान शहीद झाले होते.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) पाकिस्तानमधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दल आणि तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी परिसराला वेढा घातला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.
पाकिस्तानमध्ये विशेषतः टीटीपीने अनेक मोठे दहशतवादी हल्ले केले आहेत. भारताविरोधात दहशतवाद पोसणाऱ्या, अब्जावधी पैसे खर्च करणाऱ्या पाकिस्तानला आता दहशतवादाने पोखरले आहे. विकासाऐवजी भारताविरोधात पैसे उधळल्याने पाकिस्तान आता कंगाल देश बनला आहे. 30 जानेवारी रोजी पेशावरमधील मशिदीमध्ये दुपारच्या नमाजाच्या वेळी आत्मघातकी बॉम्बरने स्वत:ला उडवले होते. यावेळी 100 हून अधिक लोक ठार आणि 200 हून अधिक जखमी झाले होते. 2014 मध्ये पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर टीटीपीच्या हल्ल्यात 130 हून अधिक विद्यार्थी मारले गेले, जगभरातून टीका झाली होती.