शुद्ध हवा बाटलीत
By admin | Published: March 2, 2017 04:30 AM2017-03-02T04:30:50+5:302017-03-02T04:30:50+5:30
पहाडांतील ताजी, स्वच्छ हवा बाटल्यांतून विक्रीस उपलब्ध होणार आहे
ब्रिटन- पहाडांतील ताजी, स्वच्छ हवा बाटल्यांतून विक्रीस उपलब्ध होणार आहे. कल्पक ब्रिटिश नागरिक जॉन ग्रीन (६४) यांनी ही हवा बाटलीद्वारे विकायला काढली असून, तिची किमत २०० पौंड आहे. ग्रीन यांनी अतिशय शुद्ध असलेल्या स्वीस आल्पस् पर्वतांमध्ये मिळवली आहे. धूर आणि प्रदूषित हवेत राहणाऱ्या जगातील कोणालाही ही हवा विकत घेता येईल. जॉन ग्रीन हे मूलत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सल्लागार आहेत. ते म्हणाले की, ‘१० हजार फूट उंचीवर ही हवा गुप्त अशा ठिकाणची आहे व ज्या पुरुष किंवा स्त्रीकडे सगळे काही आहे त्यांना या हवेची भेट म्हणजे अद्वितीय आहे.’ हवा विकत घेणे ही कदाचित मूर्खपणाची कल्पना वाटेल, परंतु चीनसारख्या प्रदूषित देशांत बाटलीतील ‘शुद्ध हवे’ला मागणी आहे. अशा देशांतील धनाढ्य लोक केवळ काही सेकंदांच्या दिलाशासाठी हजारो पौंड खर्च करत आहेत. बाटलीतील हवा ही अल्पाइन देशातील ‘अस्सल पहाडी हवा’ असून, तेथील हवा ही जगातील सर्वात चांगली समजली जाते. मी ही हवा मिळवण्यासाठी प्रत्यक्ष तीन हजार मीटर (१० हजार फूट) उंचावर जातो. कार पार्क करून ही हवा मिळत नाही, असे बॅसल येथे राहणारे जॉन यांनी सांगितले. मी येथे २० वर्षांपासून राहतोय. स्वीस लोकांना हे माहीतच नाही की, त्यांच्याकडे अशी हवा आहे. ही हवा खूप खास आहे. मी जेव्हा पहाडांवर जातो, त्या वेळी मला खूपच छान वाटते.