शुद्ध हवेची विक्री चीनमध्ये तेजीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2016 04:00 AM2016-02-12T04:00:38+5:302016-02-12T04:00:38+5:30

पराकोटीच्या प्रदूषणामुळे बीजिंगसह अनेक मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना मोकळ््या हवेत श्वास घेणेही दुरापास्त झालेल्या चीनमध्ये सातासमुद्रापलिकडची बाटलीबंद शुद्ध हवा विकण्याचा

Pure air sales rise in China | शुद्ध हवेची विक्री चीनमध्ये तेजीत!

शुद्ध हवेची विक्री चीनमध्ये तेजीत!

Next

बीजिंग : पराकोटीच्या प्रदूषणामुळे बीजिंगसह अनेक मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना मोकळ््या हवेत श्वास घेणेही दुरापास्त झालेल्या चीनमध्ये सातासमुद्रापलिकडची बाटलीबंद शुद्ध हवा विकण्याचा धंदा सध्या तेजीत आला आहे. चिनी नववर्षाच्या दीर्घकालीन सुट्ट्या आणि त्यानिमित्त होणाऱ्या बाजारहाटाचे औचित्य साधून अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर फिरून अशी डबाबंद किंवा बाटलीबंद हवा विकणारे विक्रेते दिसत आहेत.
अर्थात शुद्ध हवेच्या या काही श्वासांसाठी चिनी नागरिक जी किंमत मोजत आहेत ती ऐकली तर तुम्हा-आम्हांसारख्यांचे श्वास नक्कीच रोखले जातील. इंग्लंड व कॅनडा यासारख्या देशांमधील शुद्ध हवा भरलेली एक बाटली येथे चक्क ११५ ते ५०० डॉलरना म्हणजे एक हजार ते ३३ हजार रुपयांना विकली जात
आहे.
हवा विकून बख्खळ पैसा करण्याच्या या गोरखधंद्यात नव्याने हात धुवून घेणाऱ्यांत ब्रिटिश उद्योजक लिओ डी वॉट््स हे ताजे उदाहरण आहे. डी वॅट्स यांनी यासाठी ब्रिटनमध्ये ‘एथाएअर’ नावाची चक्क कंपनी सुरु केली असून ब्रिटिश बेटांच्या मध्य भागातील हिरव्यागार कुरणांनी सजलेल्या डॉरसेट, सॉमरसेट आणि वेल्स इत्यादी परगण्यांमधील शुद्ध हवेची झुळुक बाटलीबंद करून ही कंपनी ती चीनमध्ये विकत आहे.
वॅट्स यांच्या कंपनीच्या बाटलीत ५८० मिली (सुमारे २० औंस) एवढी शुद्ध हवा भरलेली असते. ग्राहकांना या शुद्ध हवा मनसोक्त छातीत भरून घेता यावी यासाठी १५ बाटल्यांचा संच ८८८ डॉलर अशा सवलतीच्या दराने विकण्याची व्यापारी शक्कलही डी वॅट्स लढवीत आहेत. (वृत्तसंस्था)

कल्पना देशी, व्यापारी परदेशी
माणसाला जगण्यासाठी मूलभूत अशी हवेसारखी गोष्ट विकून त्यातून पैसा कमावणारे डी वॅट्स हे पहिले मात्र नाहीत. काही महिन्यांपूर्वी कॅनडातील ‘व्हायटॅलिटी एअर’ या कंपनीने तेथील रॉकी पर्वताच्या परिसरातील शुद्ध हवा डबाबंद स्वरूपात चीनमध्ये आणून विकण्यास सुरुवात केली.
अर्थात एका डब्याला १४ ते २० डॉलर हा कॅनडाच्या हवेचा दर ब्रिटनच्या हवेच्या तुलनेने अगदीच मामुली आहे. पण प्रदूषणाच्या घट्ट विळख्यात अडकलेल्या चिनी नागरिकांना शुद्ध हवा विकण्याचा व्यापार करण्याची कल्पना मात्र मूळची पाश्चात्य व्यापाऱ्यांची नाही. चिनी उद्योजक चेन गुआंगबिआओ यांनी सन २०१३ मध्ये सर्वप्रथम अशा हवेच्या व्यापाराची चीनमध्ये सुरुवात केली. अर्थात चेन परदेशातून आणून नव्हे तर चीनच्याच प्रदूषण नसलेल्या भागातील हवा आणून प्रदूषित शहरांमध्ये विकत होते.

Web Title: Pure air sales rise in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.