कार्बन उत्सर्जन कपातीचे उद्दिष्ट
By admin | Published: September 26, 2015 09:51 PM2015-09-26T21:51:35+5:302015-09-26T21:51:35+5:30
भारत कार्बन वायू उत्सर्जन कपातीचे उद्दिष्ट २ आॅक्टोबर रोजी म्हणजेच गांधी जयंतीदिनी जाहीर करणार आहे. हे उद्दिष्ट जाहीर करण्याची १ आॅक्टोबर ही अंतिम तारीख आहे
न्यूयॉर्क : भारत कार्बन वायू उत्सर्जन कपातीचे उद्दिष्ट २ आॅक्टोबर रोजी म्हणजेच गांधी जयंतीदिनी जाहीर करणार आहे. हे उद्दिष्ट जाहीर करण्याची १ आॅक्टोबर ही अंतिम तारीख आहे. जगातील अनेक देशांकडून ही तारीख हुकणार आहे, असे संकेत मिळत आहेत.
येत्या डिसेंबरमध्ये पॅरिसमध्ये हवामान बदलावर जागतिक परिषद होत आहे. तत्पूर्वी जगातील सर्व देशांनी आपले उद्दिष्ट जाहीर करणे अपेक्षित आहे. याबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, २ आॅक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. ते स्वत:ही शाश्वत विकासाचे आग्रही होते. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट जाहीर करण्यासाठी त्यांचा जयंती दिन हा उत्तम मुहूर्त आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार असून, त्या भेटीपूर्वी किंवा नंतर भारत आपली घोषणा करील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. दोहोंच्या चर्चेत हवामान बदल हाही महत्त्वाचा विषय असेल. अमेरिकेने कार्बन उत्सर्जन कपातीचे प्रमाण २०२५ पर्यंत २६ वरून २८ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे.