आयोवात डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
By admin | Published: February 3, 2016 02:48 AM2016-02-03T02:48:00+5:302016-02-03T02:48:00+5:30
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आयोवातील निकाल आज जाहीर झाले. टेक्सासचे सिनेटर टेड क्रूज यांनी रिपब्लिकनचे वादग्रस्त दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांना टक्कर देत
वॉशिंग्टन : अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आयोवातील निकाल आज जाहीर झाले. टेक्सासचे सिनेटर टेड क्रूज यांनी रिपब्लिकनचे वादग्रस्त दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांना टक्कर देत त्यांच्यावर आघाडी घेतली, तर हिलरी क्लिंटन आणि बर्नी सँडर्स यांच्यात काट्याची लढत झाली. त्यात हिलरी यांनी सँडर्स यांच्यावर निसटती मात केली.
आयोवातील निकालावरून असे दिसत आहे की, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रमुख तीन दावेदारांत ही लढत होणार आहे. आयोवात क्रूज आणि ट्रम्प यांच्यानंतर मार्को रुबिया जोरदार टक्कर देताना तिसऱ्या स्थानावर आहेत. ४५ वर्षीय क्रूज यांना एकूण मतांच्या २८ टक्के, तर ट्रम्प यांना २४ टक्के मते मिळाली आहेत. क्रूज यांना ट्रम्प यांच्यापेक्षा ५५०० मते अधिक मिळाली आहेत. रुबियो यांना २३ टक्के मते मिळाली आहेत. न्यूरोसर्जन ते राजकीय नेते असा प्रवास करणारे बेन कार्ल्सन हे चौथ्या स्थानावर आहेत. पण, त्यांना फक्त ९ टक्के मते मिळाली आहेत. डेमोक्रेटिक कॉकसमध्ये हिलरी क्लिंटन आणि बर्नी सँडर्स यांच्यात काट्याची लढत दिसत आहे. अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनण्यासाठी जोरदार तयारी करत असलेल्या ६८ वर्षीय हिलरी क्लिंटन यांना ५० टक्के मते मिळाली आहेत, तर सँडर्स यांना ४९ टक्के मते मिळाली आहेत. प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, दुसऱ्या स्थानावर राहिल्यामुळे मी सन्मानित झाल्याचा अनुभव घेत आहे. क्रूज यांना मी शुभेच्छा देतो. १६ जून २०१५ रोजी मी जेव्हा प्रचार सुरू केला तेव्हा मी अयोवात दुसऱ्या स्थानावर राहण्याची अपेक्षा बाळगली नव्हती.
न्यू हॅम्पशायर आणि दक्षिण कॅरोलिनात होणाऱ्या प्राइमरी निवडणुकांचा उल्लेख करून ते म्हणाले की, येथे आम्हाला चांंगला प्रतिसाद मिळेल. डेमोक्रेटिकचे संभाव्य उमेदवार हिलरी क्लिंटन अथवा सँडर्स यांना आपण पराभूूत करू, असेही ते म्हणाले. आयोवानंतर आता व्हाईट हाऊसची लढत न्यू हॅम्पशायरमध्ये पोहोचली आहे. येथे ९ फेब्रुवारीला प्राइमरी निवडणुका होणार आहेत. त्यानंतर दक्षिण कॅरोलिनात निवडणुका होतील.