Pushpak Vimaan: रावणाचं पुष्पक विमान सत्य की दंतकथा? आता श्रीलंका घेणार शोध, संशोधनाला होणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 07:22 PM2021-11-15T19:22:30+5:302021-11-15T19:23:19+5:30
Puspak Viman: रामायणामधील रावणाच्या पुष्पक विमानाबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आता श्रीलंका रावणाच्या या पुष्पक विमानाबाबतचे सत्य शोधण्यासाठी संशोधन करणार आहे.
कोलंबो - रामायणामधील रावणाच्या पुष्पक विमानाबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आता श्रीलंका रावणाच्या या पुष्पक विमानाबाबतचे सत्य शोधण्यासाठी संशोधन करणार आहे. श्रीलंकेतील बहुतांश लोकांची रावण हा जगातील पहिला पायलट होता आणि त्या काळात श्रीलंकेमध्ये विमाने आणि विमानतळ होते अशी श्रद्धा आहे. ही बाब म्हणजे केवळ दंतकथा असल्याचे नाकारून अनेक लोकांनी स्वतंत्रपणे संशोधनही केले आहे.
दोन वर्षांपूर्वी हवाई वाहतून तज्ज्ञ, इतिहासकार, पुरातत्त्ववेत्ते आणि शास्त्रज्ञांनी कोलंबोमध्ये झालेल्या एका कॉन्फ्रन्समध्ये रावणाचे पुष्पक विमान हे वास्तव असल्याच्या दाव्याला पुष्टी देण्यात आली होती. जगात पहिल्यांदा रावणाने विमान उडवले होते. तसेच तसेच हे उड्डाण श्रीलंकेतून भारतापर्यंत झाले होते. त्यानंतर रावण पुन्हा श्रीलंकेत आला होता, या दाव्यावर एकमत झाले होते.
या कॉन्फ्रन्सनंतर तत्कालिन श्रीकंला सरकारने ५० लाख रुपयांचे अनुदान दिले होते. श्रीलंकेचे हवाई वाहतूक अॅथॉरिटीचे माजी चेअरमन शशी दानातुंगे यांनी सांगितले की, कोरोना लॉकडाऊनमुळे हे संशोधन स्थगित करावे लागले होते. दरम्यान, सध्याचे राजपक्षे सरकारसुद्धा संशोधन करण्याच्या बाजूने आहे. आता पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासून हे संशोधन नव्याने सुरू होईल, अशी अपेक्षा शशी दानातुंगे यांनी सांगितले.
इतिहासाची आवड असलेले शशी दानातुंगे हे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही राहिले आहेत. त्यांनी देशातील हवाई वाहतुकीचा इतिहास जाणून घेण्यासाठी खूप प्रवास केला आहे. ते सांगतात की, रावण है केवळ पौराणिक पात्र नाही याची मला खात्री आहे. रावण हा एक खरा राजा होता. त्याच्याजवळ विमान आणि विमानतळ होते. ती विमाने ही आजच्या विमानांसारखी नसावी. निश्चितपणे प्राचीन काळी श्रीलंका आणि भारतीय लोकांकडे प्रगत तंत्र उपलब्ध होते. त्यासाठी व्यापक संशोधन करण्याची गरज आहे. शशी यांनी भारतालाही या संशोधनाचा भाग बनण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, हे संशोधन देशाच्या प्राचीन इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
दरम्यान, श्रीलंकेतील मोठ्या पर्यावरणवादी असलेल्या सुनेला जयवर्धने आपल्या पु्स्तकामध्ये रावणाच्या विमानाबाबत खूप लेखन केले आहे. आता श्रीलंकेमध्ये रावणाच्या पुष्पक विमानाबाबत कुतूहल वाढले आहे. रावणाच्या सन्मानामध्ये श्रीलंकेने अंतराळात एक उपग्रह पाठवला आहे. त्याचे नाव रावण आहे.