हृदय विकाराच्या झटक्यानं 'पुतीन' वाघाचा मृत्यू; डॉक्टरांकडून प्रयत्नांची शर्थ, पण वाचवण्यात अपयश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 12:03 PM2022-03-26T12:03:01+5:302022-03-26T12:04:14+5:30
अमेरिकेत पुतीनचा मृत्यू; डॉक्टरांनी जीव वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न ठरले व्यर्थ
वॉशिंग्टन: अमेरिकेत पुतीन नावाच्या वाघाचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. पुतीनला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र त्यांच्या पदरी अपयश आलं. पुतीन वाघ अनेक वर्षांपासून अमेरिकेतील मिनेसोटा प्राणीसंग्रहालयात वास्तव्यास होता.
इंडिपेंडंटनं दिलेल्या वृत्तानुसार, मिनेसोटा प्राणीसंग्रहालयात राहणाऱ्या पुतीन वाघाचं वय १२ वर्षे होतं. २०१५ मध्ये त्याला मिनेसोटा येथे आणण्यात आलं. २००९ मध्ये झेक प्रजासत्ताकमध्ये त्याचा जन्म झाला होता. त्याचं नामकरण पुतीन असं करण्यात आलं. त्यानंतर तो ६ वर्षे डेन्मार्कमधल्या प्राणीसंग्रहालयात होता. तिथून त्याला मिनेसोटा प्राणीसंग्रहालयात आणण्यात आलं.
काल पुतीन वाघाला हृदय विकाराचा झटका आला. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. पुतीनचा मृत्यू आमच्यासाठी दु:खद असल्याचं प्राणीसंग्रहालयाचे संचालक जॉन क्रॉले यांनी सांगितलं. मिनेसोटा प्राणीसंग्रहालयात आतापर्यंत ४४ वाघांचा जन्म झाला आहे.
अमूर वाघाच्या प्रजातींचं संवर्धन करण्यासाठी मिनेसोटा प्राणीसंग्रहालयात विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पुतीनच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. उत्तर अमेरिकेतील प्राणीसंग्रहालयांमध्ये एकूण १०३ अमूर वाघ आहेत. तर जवळपास ५०० अमूर वाघ जंगलांमध्ये राहतात.