पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड, आणखी सहा वर्षे करणार राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:48 PM2018-03-19T23:48:05+5:302018-03-19T23:48:05+5:30
व्लादिमीर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा प्रचंड मताधिक्याने निवड झाली. त्यांना ७६.६६ टक्के मते मिळाली आहेत. ते २०२४ सालापर्यंत अध्यक्षपदाची धुरा वाहतील. स्टॅलिननंतर रशियाचे अध्यक्षपद सर्वात जास्त काळ पुतीन यांनीच भूषविले आहे.
मॉस्को : व्लादिमीर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा प्रचंड मताधिक्याने निवड झाली. त्यांना ७६.६६ टक्के मते मिळाली आहेत. ते २०२४ सालापर्यंत अध्यक्षपदाची धुरा वाहतील. स्टॅलिननंतर रशियाचे अध्यक्षपद सर्वात जास्त काळ पुतीन यांनीच भूषविले आहे.
अध्यक्षपदासाठी निवडणुकीत पुतीन यांच्याविरोधात सात उमेदवार होते. पुतीन यांचे कडवे टीकाकार अलेक्झी नवल्नी यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती.
पुतीन यांना ७६.६६ टक्के मते, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार पावेल ग्रुदिनिन यांना ११.७९ टक्के,
व्लादिमीर झिरिनोव्हस्की यांना ५.६६, सेनिया सोबचॅक यांना १.६७ टक्के तर ग्रेगरी यावलिन्स्की यांना फक्त १ टक्का मते पदरात पडली. यातील अलेक्झी नवल्नी यांनी बनावट मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्यांनी रशियात विविध ठिकाणी ३३ हजार निरीक्षक पाठविले होते.
मतदान किती झाले याचे अधिकृत आकडे केंद्रीय निवडणुक आयोगाने जाहीर केले असले
तरी ते खरे नाहीत असा दावा नवल्नी यांनी केला आहे. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुतीन बेईमानी करून निवडून आले आहेत, असा आरोप प्रतिस्पर्धी उमेदवार पावेल ग्रुदिनीन यांनीही केला आहे. मात्र निवडणुक आयोगाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
विरोधकांची केली गळचेपी
२००० साली रशियाचे पहिल्यांदा अध्यक्ष बनल्यानंतर त्यांची काही काळातच या देशावर आपल्या नेतृत्वाची छाप उमटवली. त्यांच्या कारकीर्दीत विरोधी पक्षांची गळचेपी करण्यात आली आहे. केजीबी या रशियन गुप्तहेर संस्थेचे माजी अधिकारी असलेले पुतीन यांच्या अध्यक्षपदाच्या आजवरच्या कारकीर्दीत युक्रेन व रशियामध्ये चिघळलेला संघर्ष, सीरियामध्ये केलेला हस्तक्षेप, रशियावर पाश्चिमात्य देशांनी लादलेले निर्बंध अशा काही महत्त्वाचे व जिकिरीचे प्रसंग उद्भवले आहेत.
तहहयात अध्यक्षपद नको
तुम्ही २०३० साली अध्यक्षपदाची निवडणुक लढविणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पुतीन म्हणाले की, आपण तहहयात अध्यक्ष राहाण्यास उत्सुक नाही. पुतीन सध्या ६५ वर्षांचे आहेत.