पुतीन हस्तांदोलन करायला गेले, पण हातावरचे नियंत्रण सुटले; पहिल्यांदाच गंभीर अवस्थेत दिसले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 07:46 PM2022-04-28T19:46:22+5:302022-04-28T19:49:12+5:30
पुतीन यांचे हात पाय थरथरताहेत, शरीराला झटके बसताहेत; रशियाच्या अध्यक्षांना कोणता आजार झालाय?
मॉस्को: युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा करून संपूर्ण जगाचा रोष ओढवून घेणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजारानं ग्रस्त असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याशी हस्तांदोलन करत असल्याचा पुतीन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात पुतीन यांच्या हातापायाला कंप बसत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुतीन कंपवाताचा (पार्किन्सन) सामना करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पुतीन यांना पार्किन्सन आजार झाल्याचं बोललं जात होतं. तसे काही दावे काहीजणांनी केले होते. मात्र पुतीन यांच्या हातापायाला कंप बसत असल्याचं पहिल्यांदाच व्हिडीओतून समोर आलं आहे. बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांना हस्तांदोलन करण्यासाठी दोन पावलं पुढे टाकत असताना पुतीन यांच्या उजव्या हाताला कंप बसत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. कंप बसत असल्यानं त्यांनी तो हात छातीच्या जवळ धरला. पुतीन यांच्या पायांनादेखील कंपवाताचा त्रास होत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ते थोडे अडखळत चालत आहेत. या व्हिडीओमुळे पुतीन पार्किन्सन आजारानं ग्रस्त असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
पुतीन यांचं आरोग्य ठीक नसल्याची चर्चा होती. मात्र पुतीन यांची शारीरिक अवस्था दाखवणारा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आल्याचं द डेली एक्स्प्रेसनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. पुतीन यांची प्रकृती ठीक नसल्याचं स्पष्टपणे दिसून येणारा हा पहिलाच व्हिडीओ असल्याचं मॅस्साच्युएट्समधील डॉक्टर एमिली डीन्स यांनी सांगितलं.
ब्रिटिश गुप्तहेर संघटना एमआय६ चे माजी प्रमुख असलेल्या रिचर्ड डियरलव्ह यांनी पुतीन यांना पार्किन्सन झाला असावा असा अंदाज व्यक्त केला होता. पुतीन गंभीर आजाराचा मुकाबला करत असल्याची चर्चा बऱ्याच कालावधीपासून सुरू आहे.