भारताचं मोठं यश! कतार न्यायालयाने अर्ज स्वीकारला; 'त्या' आठ भारतीयांना मिळणार दिलासा?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 10:22 AM2023-11-24T10:22:40+5:302023-11-24T10:25:00+5:30
कतारने भारताच्या ८ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे
Qatar India: कतारच्या न्यायालयाने भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांचे अपील मान्य केले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर 2023 रोजी कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. आता या प्रकरणात एक मोठे अपडेट आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नौदलाच्या माजी जवानाचे अपील स्वीकारले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. हे अपील भारत सरकारने दाखल केले होते.
कतारमधील न्यायालयाने गुरुवारी (२३ नोव्हेंबर) अपीलाची कागदपत्रे स्वीकारली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालय अपीलाचा अभ्यास करत असून पुढील सुनावणी लवकरच अपेक्षित आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी त्यांच्या शेवटच्या साप्ताहिक ब्रीफिंगमध्ये सांगितले की भारताने या निर्णयाविरुद्ध आधीच अपील दाखल केले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गेल्या वर्षी २५ ऑक्टोबर रोजी मीटू भार्गव नावाच्या महिलेने ट्विट केले होते की, भारतीय नौदलाचे आठ माजी अधिकारी कतारची राजधानी दोहा येथे ५७ दिवसांपासून बेकायदेशीर नजरकैदेत आहेत. मीतू भार्गव ही कमांडर पूर्णेंदू तिवारी यांची बहीण आहे. या अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. कतारच्या न्यूज वेबसाईट अल-जजीराच्या रिपोर्टनुसार, या अधिकाऱ्यांवर कतारच्या पाणबुडी प्रकल्पाशी संबंधित माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप आहे.
कतार सरकारने या माजी अधिकार्यांवर लावलेल्या आरोपांबाबत भारत सरकारकडून कोणतीही विशिष्ट माहिती सार्वजनिक केलेली नाही. नौदलातून निवृत्त झालेले हे सर्व अधिकारी दोहा येथील अल-दहरा कंपनीत काम करत होते. ही कंपनी तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा पुरवत असे. तसेच कतारच्या नौदलाला प्रशिक्षण आणि उपकरणे पुरवली. ही कंपनी ओमानच्या हवाई दलातील निवृत्त स्क्वाड्रन लीडर खामिस अल आझमी चालवत होते. गेल्या वर्षी या भारतीयांसोबत त्यालाही अटक करण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये त्यांची सुटका झाली.
हे भारतीय कोण आहेत?
मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत- कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि राजेश. या सर्व माजी अधिकाऱ्यांनी २० वर्षे भारतीय नौदलात सेवा बजावली होती. नौदलात असताना त्यांचा कार्यकाळ निर्दोष राहिला असून त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.