कतारमध्ये राहाणाऱ्या भारतीयांसाठी महत्त्वाचे; नियमांमध्ये मोठा बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 11:21 AM2018-09-05T11:21:23+5:302018-09-05T11:34:47+5:30
कतारमध्ये सध्या 16 लाख परदेशी कामगार काम करत आहेत. त्यामध्ये आशियाई कामगारांचा मोठा भरणा आहे. एखाद्या वेगळ्याच कामाचे प्रलोभन दाखवून मजुरीचे काम देणे, नोकरी सोडण्याची परवानगी न देणे, धोकादायक कामांना जुंपणे असे प्रकार कतारमध्ये सर्रास होत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.
दोहा- गेली अनेक वर्षे कठोर रहिवासी कायद्यांमुळे कतारवर जगभरातून टिका होत आहे. विकसनशील किंवा अविकसीत देशांमधील मजुरांना कामासाठी बोलवून त्यांचा छळ करणाका देश म्हणून कतारचे नाव घेतले जाते. आता परदेशातून येणाऱ्या कामगारांवा काम देणाऱ्या कंपनीच्या परवानगीविना कतारमधून बाहेर पडता येणार आहे. हा मोठा बदल केल्यामुळे भारतीय, नेपाळी, बांगलादेशींसारख्या अनेक कामगारांना मोठा फायदा होणार आहे.
2022 साली कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यासाठी तेथे बांधकामाची मोठी कामे सुरु आहेत. स्टेडियम, रस्ते, हॉटेल्स, इमारती अशी बांधकामे तेथे सुरु आहेत. त्यासाठी जगातील अनेक देशांचे मजूर तेथे बोलावले गेले. मात्र या मजूरांना साधे मानवी अधिकारही तेथे मिळत नाहीत असे मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. या मजूरांची सर्व कागदपत्रे, पासपोर्ट काम देणाऱ्या कंपनीकडे किंवा एजंटसकडे द्यावी लागत असत. त्यांच्या परवानगीविना कामगारांना कतार सोडताच येत नसे. आता मात्र कतारने कामगारांना देश सोडायचा झाल्यास अशी परवानगी घ्यायची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने याचे स्वागत केले असून एक्झीट व्हीसा प्रणालीमध्ये कतारने बदल केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
Qatar agrees abolition of exit visa system https://t.co/KrlWcpUiv1
— GMA News (@gmanews) September 5, 2018
कफाला नियम काय आहे?
कतारमध्ये कामगारांनी प्रवेश केल्यावर त्यांना नोकरी बदलण्यासाठी तसेच देश सोडण्यासाठी काम देणाऱ्या कंपनीची परवानगी घ्यावी लागे. त्याचप्रमाणे इतर अनेक बंधने त्यांच्यावर लादण्यात येत. या पद्धतीला कफाला पद्धती असे म्हणतात. कतारमध्ये सध्या 16 लाख परदेशी कामगार काम करत आहेत. त्यामध्ये आशियाई कामगारांचा मोठा भरणा आहे. एखाद्या वेगळ्याच कामाचे प्रलोभन दाखवून मजुरीचे काम देणे, नोकरी सोडण्याची परवानगी न देणे, धोकादायक कामांना जुंपणे असे प्रकार कतारमध्ये सर्रास होत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. तसेच हे कामगार अत्यंत घाणेरड्या व अस्वच्छ जागी राहातात, त्यांच्या आरोग्याची कोणतीच काळजी कतारकडून घेतली जात नाही. यामुळे जगभरातील कामगार कार्यकर्ते आणि संघटनांनी कतारवर वारंवार टीका केली जात होती.
600 भारतीय कामगारांचा कतारमध्ये छळ, पगाराविना ठेवले अडकवून
फुटबॉल स्पर्धेवर टीका, भ्रष्टाचार व लाचखोरी
कतारचे वातावरण फुटबॉल खेळण्यासाठी योग्य नसल्याची टीका अनेक क्रीडातज्ज्ञांनी केली आहे. त्यामुळे कतारने खेळाची मैदाने पूर्ण वातानुकूलीत करण्याचा निर्णय घेतला. मोठमोठे दावेदार मागे टाकून कतारला फूटबॉल स्पर्धा भरवण्याची संधी मिळण्यामागे लाचखोरी आणि भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला जात आहे. जागतिक फुटबॉल संघटना व त्याचे तत्कालीन अध्यक्ष सेफ ब्लॅटर यांच्यावर यामुळे मोठी टीका झाली होती. ही मैदाने बांधून स्पर्धेनंतर कतार ती पुन्हा तोडणार आहे. त्यानंतर ती आफ्रिकेतील गरिब देशांना दान करण्यात येणार आहेत.