भारतासमवेत 80 देशांच्या नागरिकांना कतारमध्ये मिळणार व्हिसाशिवाय प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 08:29 PM2017-08-09T20:29:15+5:302017-08-09T20:29:24+5:30
अरब देशांनी प्रतिबंध घातल्यामुळे अडचणीत सापडलेल्या कतारनं इतर देशांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दोहा, दि. 9 - अरब देशांनी प्रतिबंध घातल्यामुळे अडचणीत सापडलेल्या कतारनं इतर देशांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कतारनं 80 देशांतील नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. या देशांमध्ये भारतासह ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. मात्र पाकिस्तानला व्हिसाशिवाय प्रवेश देणा-या देशांच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. कतारचे पर्यटन प्राधिकरणाचे अध्यक्ष हसन अल इब्राहिम यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, व्हिसाशिवाय प्रवासाचे आदेश तात्काळ लागू करण्यात आले आहेत. 80 देशांतील नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवेश देण्याच्या परवानगीमुळे कतार सर्वात मोठा मुक्त देश झाला आहे. पर्यटकांना आता कतारची मेजवानी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटता येणार आहे. व्हिसामुक्त देशांच्या यादीतील नागरिकांना कतारमध्ये येण्यासाठी व्हिसा अर्ज शुल्क भरावं लागणार नाही. त्यांना प्रवेशाच्या ठिकाणापासूनच विशेष सवलत देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी संबंधित व्यक्तीकडे पासपोर्ट आणि परतीच्या प्रवासाचं तिकीट असणं गरजेचं आहे. व्हिसाशिवाय प्रवेश देणा-या देशांच्या दोन याद्या करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत 33 देशांचा समावेश आहे. नागरिकांना दिलेली सवलत 180 दिवसांसाठी वैध असून, 90 दिवसांपर्यंत ते कतारमध्ये वास्तव्य करू शकणार आहेत. तर दुस-या यादीत भारत, अमेरिका, ब्रिटनसह 47 देशांचा समावेश आहे. या नागरिकांना देण्यात आलेली सवलत 30 दिवसांसाठी वैध असून, ते दिलेल्या मुदतीपर्यंतच कतारमध्ये राहू शकणार आहेत. मात्र त्यानंतर त्या देशांतील नागरिकांना 30 दिवसांच्या सवलतीत मुदतवाढही मिळू शकते.