Qatar Princess: भावाशी लग्न नाही करायचे...असे म्हणत कतारच्या राजकुमारीने सोडला देश; पण कारण वेगळेच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 02:55 PM2022-12-15T14:55:56+5:302022-12-15T14:56:43+5:30
Qatar News: सध्या कतार फिफा वर्ल्ड कपमुळे चर्चेत आहे. पण, यातच कतारच्या राजकुमारीचीही चर्चा होत आहे.
Qatar Transgender princess: अतिशय कडक कायदे असलेला इस्लामिक देश कतार सध्या फिफा विश्वचषक स्पर्धेमुळे जगात चर्चिला जात आहे. पण, कतार तिथल्या कठोर कायद्यांमुळे अनेकदा चर्चेत असतो. छोट्या-मोठ्या गुन्ह्यांसाठी कतारमध्ये अतिशय भयानक शिक्षा दिली जाते. अशीच शिक्षा समलैंगिकतेसाठीही आहे.
राजकुमारीने सोडला देश
जगातील अनेक देशांनी समलैंगितेला मान्यता दिली आहे, पण कतारमध्ये हा गंभीर गुन्हा आहे. या कायद्यामुळे इथल्या एका राजकुमाराली देशातून पळ काढावा लागला होता. राजकुमारीसह अनेकांनी याच कारणामुळे देश सोडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमारी कतारच्या सत्ताधारी कुटुंब अल थानीची सदस्य आहे.
नेमकं काय झालं?
कतारमध्ये समलैंगिकतेवर बंदी आहे. राजकुमारी स्वतः समलैंगिक आहे. अशा परिस्थितीत समलैंगिक असल्यामुळे कठोर शिक्षा होऊ शकते, अशी भीती तिला वाटत होती. यामुळेच तिने घरातून पळ काढला आणि ब्रिटनला आश्रय गेतला. लंडनच्या संडे टाइम्सने लीक झालेल्या कागदपत्रांच्या आधारे वृत्त प्रकाशित केले. यानुसार, राजकुमारीचे जबरदस्तीने तिच्या चुलत भावाशी लग्न लावले जाणार होते. पण, त्यापूर्वीच तिने पलायन केले.
यासाठी 3 वर्षांची शिक्षा
कतारमध्ये समलैंगिकतेसाठी 3 वर्षांची कठोर शिक्षा आहे. त्यामुळेच भीतीपोटी राजकुमारीने घर सोडले. यूके सरकारकडे उपलब्ध असलेल्या या राजकुमारीच्या कागदपत्रांनुसार, 2015 च्या उन्हाळ्यात ती आपल्या कुटुंबासह लंडनला कौटुंबिक सहलीवर आली होती. यादरम्यान ती मित्रासह तेथून पळून गेली. आता लाखो क्रीडाप्रेमी कतारमध्ये आले असताना या देशातील कठोर कायद्यांची चर्चा होत आहे. यातच समलैंगिकता कायद्याचीही चर्चा होत असल्यामुळे राजकुमारीची गोष्ट पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे.